Thu, Jul 18, 2019 10:38होमपेज › Konkan › शांततेच्या मार्गाने होणार जेलभरो! 

शांततेच्या मार्गाने होणार जेलभरो! 

Published On: Aug 07 2018 10:54PM | Last Updated: Aug 07 2018 9:26PMकणकवली : वार्ताहर

मराठा समाजाकडून 9 ऑगस्ट रोजी होणारे जेलभरो आंदोलन हे शांततेच्या मार्गाने होणार आहे. शांतता भंग होईल असे कोणतेही अनुचित कृत्य होवू नये, याची दक्षता प्रत्येक मराठा बांधवाने घ्यायची आहे. आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रशासनाकडूनही सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे. मोठ्या संख्येने मराठा बांधव जेलभरो आंदोलनात सहभागी होतील, असा विश्‍वास कणकवली येथे झालेल्या नियोजन बैठकीत करण्यात आला.

सकल मराठा समाजाच्या 9 ऑगस्ट रोजी होणार्‍या जेलभरो आंदोलनाचे नियोजन येथील संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत करण्यात आले. ज्येष्ठ नेते एस. टी. सावंत, लवू वारंग, अ‍ॅड. हर्षद गावडे, भाई परब, सोनू सावंत, नयन राणे, अजय गावकर आदी उपस्थित होते.  मराठा समाजाच्या न्याय हक्कांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.  शासनाला जाग आणण्यासाठी व मराठा आरक्षणाचा निर्णय त्वरीत व्हावा यासाठी हे आंदोलन होत आहे. या आंदोलनात हजारोच्या संख्येने मराठा बांधव सहभागी होणार आहेत. आंदोलन शांततेच्या मार्गाने असून प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे. प्रशासनाकडूनही सहकार्य अपेक्षीत आहे. मराठा समाजाच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने या आंदोलनात सहभागी व्हायचे आहे. 9 ऑगस्ट रोजी स. 10 वा. कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा बांधवांनी उपस्थित रहावयाचे आहे, असे आवाहन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आले आहे.