Sat, Jul 20, 2019 10:54होमपेज › Konkan › कांजीवरा, दाभोळच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा होणार बंद

कांजीवरा, दाभोळच्या इंग्रजी माध्यमांच्या शाळा होणार बंद

Published On: Dec 11 2017 1:30AM | Last Updated: Dec 10 2017 9:39PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

देवरूखातील कांजीवरा आणि दाभोळ येथील दोन इंग्रजी माध्यमांच्या अनधिकृत शाळा बंद करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे या दोन शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची वेळ आली आहे. शासनाची मान्यता न मिळवताच जून 2017 पासून या दोन्ही शाळा सुरू झाल्या आहेत.

मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी पालकवर्ग जीवाचे रान करत असतो. दोन-चार महिने कमी-जास्त होवून शाळेत प्रवेश मिळाला नाही तरी पाल्याच्या होणार्‍या शैक्षणिक नुकसानीच्या भितीने पालकांचा जीव कासावीस होतो. अशा परिस्थितीमुळे डोनेशनचे फॅड निर्माण होते. मुलासाठी काहीही करून डोनेशनची व्यवस्था केली जाते. एकीकडे अशी परिस्थिती असताना देवरूखातील काजीवरा आणि दाभोळे शाळेत दाखल झालेल्या छोट्या विद्यार्थ्यांचे पूर्ण वर्षच वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे.

आयडियल प्रायमरी स्कूल आणि ब्ल्यूमिंग बर्डस् इंटरनॅशनल स्कूल या दोन शाळांना शाळा सांकेतांक नंबर नसल्याचे आढळून आले आहे. शाळेच्या मान्यतेसाठी जि.प.च्या शिक्षण विभागाकडून प्रस्ताव शासनाकडे जातो. येथे यूडायस (शाळा सांकेतांक) नंबर मिळाल्यानंतर ती शाळा मान्यताप्राप्त होते. परंतु या शाळांनी ही कोणतीही कार्यवाही पूर्ण करून न घेता शाळा सुरू केल्याचे आढळून आले आहे.

देवरूख पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकार्‍यांनी या शाळा बंद करण्याची नोटीस बजावली आहे. त्याबाबतचा अहवाल जि.प. शिक्षण विभागाला कळवला आहे. त्यानुसार कारवाईची पुढील चके्र फिरू लागली आहेत. या कारवाईमुळे काजीवरा शाळेतील 15 आणि ब्ल्यूमिंग बर्डस् शाळेतील पहिलीच्या 6 अशा 21 विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची भिती निर्माण झाली आहे. 

येत्या आठ दिवसात कायदेशीर कारवाई

जिल्हा परिषद शिक्षण समितीची सभा गेल्या गुरूवारी झाली. या शाळांना मान्यता नसल्याबाबत सभेत चर्चा झाली. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी येत्या आठ दिवसात कायदेशीर कारवाई करण्याचा ठराव करण्यात आला असल्याचे जि.प. शिक्षण समिती सभापती दीपक नागले यांनी सांगितले.