Wed, Aug 21, 2019 14:46होमपेज › Konkan › पहिला दिवस निरंक ; इच्छुकांचे पक्षस्तरावर अर्ज

पहिला दिवस निरंक ; इच्छुकांचे पक्षस्तरावर अर्ज

Published On: Mar 12 2018 10:54PM | Last Updated: Mar 12 2018 10:34PMकणकवली : प्रतिनिधी

कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी सोमवारी पहिल्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नाही. मात्र इच्छुकांनी आपापल्या पक्षस्तरावर अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे. पक्षांकडून त्यानंतर इच्छुकांच्या मुलाखती होवून उमेदवारी यादी येत्या दोन दिवसात जाहीर केली जाणार आहे. दरम्यान सेना-भाजपमधील युतीबाबत अद्यापही कोणताही ठोस निर्णय झालेला नाही. तर गावविकास पॅनेल स्वबळावर निवडणूक लढविणार की अन्य कुठल्या पक्षाशी युती करणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

कणकवली नगरपंचायतीची निवडणूक 6 एप्रिलला होत आहे. या निवडणुकीसाठी 12 ते 19 मार्चमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करावयाचे आहेत. या पार्श्‍वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपपल्या पक्षातील इच्छुकांचे पक्षस्तरावर अर्ज घेण्यास सुरूवात केली आहे. सोमवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षातर्फे नगराध्यक्ष व नगरसेवक या पदासाठी 12 उमेदवारांनी अर्ज पक्षाकडे दाखल केले. यामध्ये नगराध्यक्षपदासाठी माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेवक समीर नलावडे व माजी नगरसेवक अभय राणे तर नगरसेवकपदासाठी उमेश वाळके, संजय कामतेकर, शैलजा कदम, संजय मालंडकर, विराज भोसले, प्रतिक्षा सावंत, अभिजित मुसळे, संदीप नलावडे, सुप्रिया नलावडे, अण्णा कोदे, पूनम म्हापसेकर, रवींद्र उर्फ बाबू गायकवाड, महेंद्र सांब्रेकर यांनी अर्ज दिले आहेत.  

तर भाजपतर्फेही उमेदवारांनी पक्षस्तरावर अर्ज दाखल करण्यास सुरूवात केली. काँग्रेसनेही अशीच कार्यवाही सुरू केली आहे. मात्र राष्ट्रवादीने अद्याप आपले  पत्ते खोललेले नाहीत. शिवसेनेने यापूर्वीच पक्षीय स्तरावर संभाव्य उमेदवार निश्‍चित केले आहेत. दरम्यान सेना-भाजपमध्ये युती होण्याबाबत दोन्ही पक्षांकडून प्राथमिक चर्चा झाली असली तरी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारावरच युतीचे भवितव्य ठरणार आहे. मात्र शिवसेनेने तुर्तास स्वबळावर लढण्याच्यादृष्टीने आपली मोर्चेबांधणी केली आहे. गाव विकास पॅनेलनेही नगराध्यक्षपदासाठी काही नावांवर विचार सुरू केला आहे. मात्र अद्याप त्याबाबत अंतिम निर्णय झालेला नसल्याचे समजते.  अर्थात गाव पॅनेल कुठल्या पक्षाशी युती करणार का यावरही बर्‍याच गोष्टी अवलंबून आहेत. मात्र गाव पॅनेलने यापूर्वीच नगराध्यक्षपदावर आग्रह धरला असून त्यांचा प्रस्ताव मान्य करणार्‍या पक्षाबरोबरच युती किंवा तडजोड होणार आहे. 

दरम्यान सर्वच पक्षांच्या इच्छूक उमेदवारांनी आपली संभाव्य उमेदवारी लक्षात घेवून आपापल्या प्रभागात संपर्क वाढविला आहे. तसेच मतदारांचा गाठीभेटी सुरू केल्या आहेत. येत्या दोन-तीन दिवसातच उमेदवारीबाबतचे सर्व चित्र स्पष्ट होवून हळूहळू राजकीय रण तापण्यास सुरूवात होणार आहे.