होमपेज › Konkan › कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे धरणे आंदोलन

Published On: Dec 20 2017 1:41AM | Last Updated: Dec 19 2017 11:12PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्हा संघटनेने मंगळवारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन केले. विविध स्तरांवर आंदोलने केल्यानंतरही मागण्यांची तड न लागल्याने  कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवारी जिल्हास्तरावर संघटित होत शासकीय धोरणांचा निषेध केला. या नंतरही मागण्यांबाबत सकारात्मकता न दर्शविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी महासंघाच्या वतीने देण्यात आला. महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या निर्देशानुसार रत्नागिरी जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी तालुकास्तरावर एकदिवसीय धरणे आंदोलन करीत शासनाच्या धोरणांविरोधात आंदोलने केली. 

‘मागण्या मान्य करा’

रत्नागिरीः प्रतिनिधी 

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांना नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्वांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे, पायाभूत पदावरील शिक्षकांना नियुक्‍ती मान्यता व वेतन देणे, मंजूर वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्‍ती मान्यता देणे व त्यांच्या वेतनासाठी आर्थिक तरतूद करणे या प्रमुख  मागण्यांसह अन्य सुमारे तीस मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

2017 चा वरिष्ठ व निवडश्रेणीचा बेकायदेशीर आदेश त्वरित रद्द करावा, 24 वर्षे सेवा झालेल्या सर्व शिक्षकांना निवड श्रेणी द्यावी, अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत प्रथम तीन फेर्‍या अनुदानित कराव्यात, 42 दिवसांच्या संपकालीन रजा पूर्ववत खात्यावर जमा कराव्यात, शालार्थ प्रणालीत पूर्वीप्रमाणेच अधिकार वेतन अधीक्षकांना देण्यात यावेत, वैद्यकीय खर्च प्रतीपूर्तीसाठी कॅशलेस प्रणाली त्वरित सुरू करावी आदी मागण्यांसाठी यावेळी महासंघाने शासनाने अवलंबबिलेल्या विरोधी धोेरणाचा निषेध केला. यानंतरही मागण्या मान्य न झाल्यास 18 जानेवारी रोजी राज्यातील सर्व आठही विभागांतील शिक्षण उपसंचालक कार्यालयांवर धडक मोर्चे काढण्यात येणार आहेत. त्यानंतर 2 फेब्रुवारी रोजी राज्यातील सर्व ज्युनिअर कॉलेज बंद ठेवण्यात येणार आहेत. त्या नंतर 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या काळात आंदोलन करण्यात येणार असल्याचे महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रकाश औताडे यांनी सांगितले.

धरणे आंदोलनात सचिव  प्रा. अनिल उरुणकर,  प्रा. बी. आर. पाटील, प्रा. दिलीप माळी, प्रा. अस्मिता कुलकर्णी, नानासाहेब हाके, संजय कुलकर्णी, व्ही. बी. घोडके, प्रा. विनायक  बांद्रे, प्रा. श्रीराम  दांडेकर आदींसह जिल्ह्याभरातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक सहभागी झाले होते.