Wed, Feb 19, 2020 08:54होमपेज › Konkan › क. महाविद्यालयीन शिक्षक ५ टप्प्यांत आंदोलन छेडणार

क. महाविद्यालयीन शिक्षक ५ टप्प्यांत आंदोलन छेडणार

Published On: Dec 03 2017 1:07AM | Last Updated: Dec 02 2017 10:19PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी पाच टप्प्यांत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात असल्याचे माहिती राज्याध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांनी दिली.

दि. 26  नोव्हेेंबर रोजी मुंबई येथील झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला रत्नागिरी जिल्ह्याचे पदाधिकारी प्रा. अनिल उरूणकर, प्रा. प्रकाश औताडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. सभेमध्ये पाच टप्प्यांमध्ये आंदोलन छेडणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. दि. 6 सप्टेंबरच्या बैठकीत  दिवाळीपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या मागण्यांची तातडीने पूर्तता करण्यात येईल, असे आश्‍वासन शिक्षण मंत्र्यांनी  संघटनेला दिले होते.

मात्र, महिना उलटला तरी आश्‍वासनांची पूर्तता न झाल्याने अखेर 14 नोव्हेंबरला मुंबई संघटनेने एक दिवसीय इशारा आंदोलन केले,तसेच इतर विभागांमध्येही आंदोलने करण्यात आली, तरीसुद्धा शिक्षण विभागाने कोणतीच दखल घेतली नाही. त्यामुळे आता मागण्यांच्या पूर्ततेचा लढा अधिक तीव्र करण्याचा निर्णय राज्य महासंघाने घेतला आहे.

कार्यकारिणीच्या निर्णयानुसार दि. 8 डिसेंबरला राज्यातील सर्व तहसीलदार कार्यालयावर धरणे आंदोलन व त्यांच्यामार्फत शासनास निवेदन देण्यात येईल. तसेच राज्यातील सर्व आमदारांनाही मागण्यांचे निवेदन देणार. दि. 19 डिसेंबरला सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर धरणे आंदोलन व त्यांच्यामार्फत राज्य शासनाला निवेदन देण्यात येईल. तसेच सर्व जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांमार्फतही शासनास निवेदन देण्यात येणार आहे. 

आंदोलनात दि.18 जानेवारी 2018 रोजी राज्यातील सर्व आठही विभागांत शिक्षण उपसंचालक कार्यालयांवर धडक मोर्चे काढण्यात येतील व त्यांच्यामार्फत शासनास निवेदन देण्यात येईल तसेच सर्व विभागीय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षां मार्फतही शासनास निवेदन देण्यात येईल. दि. 2 फेब्रुवारीला राज्यातील सर्व ज्युनियर कॉलेज बंद ठेवण्यात येतील. कॉलेज बंद आंदोलनानंतर पुढे 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या काळात नाईलाजाने आम्हाला आंदोलन करावे लागल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी अकार्यक्षम अधिकारी व शासनाचीच असेल, असा  इशारा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाकडून शासनाला देण्यात आला आहे.