Thu, Apr 25, 2019 13:59होमपेज › Konkan › नोकरीच्या आमिषातून होतेय फसवणूक

नोकरीच्या आमिषातून होतेय फसवणूक

Published On: May 10 2018 1:36AM | Last Updated: May 09 2018 8:27PMरत्नागिरी : प्रतिनिधी

सोशल मीडियावर विविध सरकारी, खासगी, बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील भरती, गलेलठ्ठ  पगारांच्या जाहिरातींचा सध्या जोरदार भडीमार सुरू आहे. व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवरील नोकरीच्या जाहिरातींबद्दल साशंकता असली तरी खासगी वेब पोर्टल मात्र विश्‍वासार्ह असल्याचा अनुभव तज्ज्ञ आणि विद्यार्थ्यांकडून व्यक्‍त केला जात आहे. परंतु, अनेक साईट्वरच्या जाहिराती बनावट असल्याने नोकरी शोधताना सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

सोशल मीडियामुळे जगाच्या कुठल्याही भागात काहीही घडले की, काही मिनिटांतच हातातील मोबाईलवर अक्षरांच्या किंवा ध्वनिचित्रफितींच्या स्वरूपात माहिती येऊन धडकते. मोबाईल क्रांतीमुळे जग जवळ आले असून फोर जी इंटरनेट सुविधेमुळे ‘ग्लोबल व्हिलेज’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे. मात्र, मोबाईलद्वारे प्रसारित होणारी सर्वच माहिती खरी असते का, त्याची विश्‍वासार्हता काय, अप्रत्यक्षरित्या ऑनलाईन फसवणूक करणारी तर नाही ना याची खात्री करून घेतली पाहिजे. 

सध्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, ई-मेलद्वारे विविध सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, नामांकित कंपन्या, बँका, सैन्य भरती, खासगी बहुराष्ट्रीय कंपन्यांमधील नोकर्‍यांच्या भरती, पदे आणि पगारांच्या आकड्यांसह शैक्षणिक पात्रतेची आकर्षक माहिती येते. फॉरवर्ड संस्कृतीमुळे जाहिरातींच्या सत्यतेची शहानिशा न करता आपणही नकळत मित्र-मैत्रिणी, नातेवाईकांना अशी माहिती फॉरवर्ड करतो. सोशल मीडियाद्वारे आलेल्या जाहिरातीवरील क्रमांकांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता 80 टक्के जाहिराती खोट्या निघतात. 

मात्र, खास नोकरीसाठी असलेल्या पेड आणि फ्री वेब पोर्टलवरील नोकरीच्या जाहिराती खर्‍या असल्याचे आढळले. त्यामुळे नोकरी शोधणार्‍या तरुणांनी अशा व्हायरल जाहिरातींची शहानिशा करणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे. बहुतांशी व्हायरल जाहिराती खोट्या असतात; परंतु, वेब पोर्टलद्वारे मिळणारी माहिती शंभर टक्के खरी असते. नोकरी आणि पॅकेजच्या आशेने काहींची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याच्या घटना घडू लागल्या आहेत. त्यामुळे नोकरी शोधताना सत्यता पडताळून पावले उचलायला हवीत, अशी प्रतिक्रिया या क्षेत्रातील मान्यवरांनी दिली.

सतर्कता बाळगायला हवी

सध्या सोशल मीडिया हा माहितीचा स्रोत बनला आहे. त्यामुळे मोबाईलवर येणारी प्रत्येक माहितीची सत्यता पडताळणी करून घेतली पाहिजे. आकर्षक पगारांच्या जाहिराती व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल होतात; परंतु अनेकवेळा त्या खोट्या निघतात. इंटरनेटवर नोकरीसाठी स्वतंत्र वेब पोर्टल पेड आणि फ्री कंपन्यांच्या जाहिराती खर्‍या असतात. त्यातून नोकर्‍या मिळतात. त्यामुळे नोकरी शोधणार्‍यांनी ऑनलाईन नोकरी शोधताना काळजी घ्यावी, जेणेकरून त्यांची कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही.