रत्नागिरी : प्रतिनिधी
सुट्यांमध्ये नागरिक फिरण्यासाठी बाहेर जातात याचा फायदा घेत चिपळूण शहरात धुमाकूळ घालणाऱ्या चोरट्यांनी आपला मोर्चा रत्नागिरी शहराकडे वळविला आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास सन्मित्र नगर येथील बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांने 36 तोळे सोन्याचे दागिने लांबवले. तर, शेजारी असलेल्या एका पोलिसाच्या घरात काहीच न सापडल्याने फ्लॅट फोडून चोरटे पसार झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, बांधकाम व्यावसायिक सचिन नांदगावकर हे दोन दिवसांपूर्वी कामानिमित्त कुटूंबासह परगावी गेले होते. गुरुवारी सकाळी त्यांच्या शेजाऱ्यांना नांदगावकर यांच्या फ्लॅटचा दरवाजा व कडी उचकटलेली दिसली. त्यांनी तत्काळ नांदगावकर यांना त्याबाबतची कल्पना दिली. गुरुवारी सायंकाळी सचिन नांदगावकर हे रत्नागिरीत दाखल झाले. घरात गेल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
नांदगावकर यांच्या घरातून चोरट्याने 15 लाख रूपये किमतीचे 36 तोळे दागिने लांबविले. घरातील कपाट चोरट्यानी फोडले आहे. आतील सोन्याचे दागिने , रोकड घऊन चोरटे पसार झाले. याबाबतची तक्रार नांदगावकर यांनी शहर पोलिस स्थानकात दिली असून या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, शहर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, चोरट्यांच्या शोधसाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.