Wed, Jul 24, 2019 08:17होमपेज › Konkan › पॉलिशच्या बहाण्याने दागिने लंपास 

पॉलिशच्या बहाण्याने दागिने लंपास 

Published On: May 10 2018 1:36AM | Last Updated: May 09 2018 11:17PMबांदा : तुषार धुरी

दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने आलेल्या दोन अनोळखी भामट्यांनी मडुरा-परबवाडी येथील सौ. शर्मिला शांताराम शिरोडकर यांचे 18 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र व मुलगी कु. कीतीर्र्का  हिची सुमारे 5 ग्रॅम वजनाची चेन असा सोन्याचा ऐवज लंपास केला. या घटनेचा सौ. शर्मिला यांना मानसिक धक्‍का बसला आहे. त्यांना उपचारासाठी प्रथम  बांदा प्रा.आ.केंद्रात व नंतर अधिक उपचारासाठी सावंतवाडी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मडुरा येथे बुधवारी झालेल्या या धाडसी चोरीमुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेनंतर अर्ध्या तासाच्या अवधीत लगतच्या पाडलोस गावातही भामट्यांनी असाच प्रयत्न केला. त्यानंतर  या भामट्यांनी शिरोड्याच्या दिशेने  दुचाकीवरून पळ काढला. घटनेची फिर्याद शांताराम शिरोडकर यांनी बांदा पोलिसांत दिली.

सौ. शर्मिला शिरोडकर या कुटुंबासमवेत मडगाव (गोवा) येथे राहतात. चार दिवसांपूर्वीच त्या मडुरा- परबवाडी येथे आपल्या सासरी आल्या होत्या. बुधवारी दुपारी सौ. शर्मिला  घरात आपली सासू लक्ष्मी व मुलगी कीर्तीका यांच्यासोबत होत्या. दुपारी 12 वा.च्या सुमारास दोन अनोळखी युवक दुचाकीवरून दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने तेथे आले. कमी दरात दागिने पॉलिश करून देतो, असे सांगितल्याने सौ. शिरोडकर यांनी आपले मंगळसूत्र व सोन्याची चेन पॉलिश करण्यासाठी त्यांच्याकडे दिले.काही वेळाने चोरट्यांनी दागिने पॉलिश झाल्याचे सांगत ते डबीत घालून दिले, तसेच अर्ध्या तासाने डबी उघडण्याची सूचना करत   तेथून पोबारा केला. सौ.शिरोडकर यांनी 20 मिनिटांनंतर डबी उघडून पाहिली असता त्यात दागिने नसल्याचे निदर्शनाला आले. आपण पुरते फसलो असल्याचे लक्षात येताच सौ.शिरोडकर यांनी याबाबतची कल्पना शेजार्‍यांना दिली. स्थानिकांनी चोरट्यांचा मडुरा तिठ्यापर्यंत पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरटे दिसून आले नाहीत.

दरम्यान, चोरट्यांनी दुपारी 1 वा.च्या सुमारास पाडलोस - केणीवाडा येथील विश्‍वनाथ नाईक यांच्या घरी जात दागिने पॉलिश करण्यासाठी मागितले.मात्र, नाईक यांना संशय आल्याने त्यांनी चोरट्यांनी हाकलून लावले.याबाबतची फिर्याद दाखल करुन घेण्याचे काम बांदा पोलिसांत बुधवारी रात्री उशिरापर्यत सुरू होते. 

...अन् त्या जागीच कोसळल्या

चोरीच्या या प्रकाराचा सौ. शिरोडकर यांना जबर मानसिक धक्‍का बसल्याने त्या जागीच कोसळल्या. त्यांना  अत्यावस्थ स्थितीत तातडीने बांदा  प्रा. आ. केंद्रात  दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी प्रणाली कासार यांनी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना सावंतवाडी येथे दाखल केले.