Sat, Jun 06, 2020 21:31होमपेज › Konkan › जांभेकरांच्या भूमीत जर्नालिझम विद्यालय सुरू व्हावे

जांभेकरांच्या भूमीत जर्नालिझम विद्यालय सुरू व्हावे

Published On: Feb 20 2018 1:17AM | Last Updated: Feb 19 2018 11:04PMकासार्डे : वार्ताहर

जर्नालिझम विद्यालय आणि साहित्य अकादमीची स्थापना हीच पत्रकारिकेचे पहिले नियतकालिक सुरू करणारे, आद्यप्रवर्तक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना खर्‍या अर्थाने  श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन फणसगाव पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष सहदेव नारकर यांनी व्यक्‍त केले.

मुंबई विद्यापीठ स्तरीय निवासी श्रमसंस्कार शिबिर पोंभुर्ले येथे झाले. या शिबिराच्या  उद्घाटन प्रसंगी सहदेव नारकर बोलत होते.  विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ .बी. एस. बिडवे, फणसगाव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक  नारकर, उपाध्यक्ष अनिरुद्र नारकर, दिलीप नारकर, सदस्य अनंत गुरव,सरपंच सादिक डोंगरकर,  जि.प.सदस्य प्रदीप नारकर, समाजसेवक बंड्या नारकर, विठ्ठलादेवी सरपंच दिनेश नारकर, उंडील सरपंच कृष्णा नर,पाटगाव सरपंच सौ. श्रद्धा गुरव, यशवंत पेंडूरकर, रमेश नारकर, कार्यकारी मंडळ सदस्य भगवान गुरव, दीपक कानडे,   राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख श्री. भोगले व अन्यर उपस्थित होते.

सहदेव नारकर म्हणाले, विं.दा करंदीकर यांच्यासारख्या थोर साहित्यिकांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या मातीत असंख्य रत्ने दडलेली आहेत. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पत्रकारिता विद्यालयाची आणि साहित्य अ‍ॅकॅडमीची गरज आहे. बाळशास्त्री जांभेकरांच्या पुण्यतिथीनिमित्त शासनाकडून दरवर्षी मिळणारा दहा लाखांचा निधी कुठे मुरतो, त्याची चौकशीची मागणी सहदेव नारकर यांनी याप्रसंगी केली. मुंबई विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. बी. एस. बिडवे यांनी राष्ट्रीय सेवा योजना, त्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले.

शिबिरात 7 जिल्ह्याचा  समावेश

पोंभुर्ले येथे आयोजित एन. एस.एस. कॅम्पमध्ये  मुंबई अंतर्गत तीन जिल्हे तसेच पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग असे मिळून सात जिल्ह्यातील  व आठ विभागातून  निवडक 100  विद्यार्थी व विद्यार्थिनी या शिबिरात सहभागी झाले आहेत. पोंभुर्ले  हे मुंबई विद्यापीठाने विकासाच्या दृष्टीकोनातून  दत्तक  घेतले असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.