Mon, Jan 27, 2020 10:55होमपेज › Konkan › सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी

सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी

Published On: Jan 23 2019 1:04AM | Last Updated: Jan 23 2019 1:04AM
राजापूर : प्रतिनिधी

साडेचार वर्षांपूर्वी देशातील जनतेला मोठी आश्‍वासने देऊन सत्तेवर आलेले केंद्रातील सरकार नोटाबंदी, जीएसटीसहीत सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. देशात अस्थिरतेचे वातावरण पसरविणार्‍या केंद्रासहित राज्यातील सरकारला सत्तेतून पायउतार करण्याची वेळ आली आहे, अशी टीका प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी राजापुरात केली.

केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराविरोधात प्रदेश काँग्रेसच्या वतीने ‘जनसंघर्ष यात्रा’ सुरू असून सहाव्या टप्प्यात तिचे कोकणात आगमन झाले. सकाळी सिंधुदुर्गवरून ती राजापुरात दुपारी तीन वाजता दाखल झाली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरू असून त्यांच्यासमवेत खा. हुसेन दलवाई, माजी मंत्री नसीम खान, प्रदेश प्रवक्ते सचिन सावंत, डॉ. हरीश रोग्ये, आ. हुस्नबानू खलिफे, आ. अमर  राजूरकर, आ. भाई जगताप, नगराध्यक्ष अ‍ॅड. जमीर खलिफे आदी उपस्थित होते. या संघर्ष यात्रेदरम्यान काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका केली. 

विविध आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारने राफेल प्रकरणात गैरव्यवहार केल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी केला. केंद्रासमवेत राज्य शासनावरदेखील त्यांनी निशाणा साधला. या सरकारमुळे महाराष्ट्र राज्यावर 5 लाख कोटींचे कर्ज असून हे सरकारही बोगस असल्याचा त्यांनी हल्ला चढविला.  मंत्रिमंडळात सहभागी असताना दुटप्पी भूमिका घेत असलेल्या शिवसेनेवरदेखील त्यांनी टीका केली. या यात्रेच्या कार्यक्रमादरम्यान सागवे भागातील अनेक शिवसैनिकांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

नाणारवासीयांसोबत राहणार : खा. चव्हाण

नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी शासनाला धारेवर धरले. कोकणचे सौंदर्य लक्षात घेता शासनाने कोकणच्या हिताचा विचार करणे आवश्यक होते. मात्र, राज्य सरकारचे मुख्यमंत्री व उद्योगमंत्री यांची वेगवेगळी आलेली विधाने पाहता त्यांना कोकणातील जनतेशी काहीच देणे घेणे नाही, अशा शब्दांत चव्हाण यांनी फटकारले. आम्ही नाणारवासीयांसमवेत आहोत, असेही ते म्हणाले.