होमपेज › Konkan › ‘जलयुक्‍तशिवार’चा तिसरा टप्पा रखडणार?

‘जलयुक्‍तशिवार’चा तिसरा टप्पा रखडणार?

Published On: Feb 19 2018 1:22AM | Last Updated: Feb 18 2018 8:23PMआरवली :  वार्ताहर

राज्यातील प्रत्येक गाव पाण्याबाबत स्वयंपूर्ण झाले पाहिजे, यासाठी जलयुक्‍त शिवार योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पहिल्या व दुसर्‍या टप्प्यातील कामे पूर्णत्त्वाच्या मार्गावर असताना तिसर्‍या टप्प्यासाठी अंतिम आराखडा मंजूर करण्यात आला आहे. यासाठी टंचाईग्रस्त गावांचीच निवड करण्यात आली आहे. परंतु, बंधारे बांधकामासाठीचे निकष हे कोकणच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार न करता, राज्यासाठी एकसारखेच तयार केल्यामुळे तिसर्‍या टप्प्यातील कामे रखडण्याची शक्यता आहे.

तिसर्‍या टप्प्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील 40 गावांची निवड करण्यात आली असून, यासाठी 18 कोटी 16 लाख 28 हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. 1 हजार 426 कामांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विकास माथा ते पायथा या तत्त्वावर गावांची निवड करून वरच्या भागात 70 टक्के क्षेत्र व खालच्या भागात 30 टक्के विकासाची कामे हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभागाकडे 1 हजार 277 कामांचे उद्दिष्ट असून, 1591.30 हेक्टर क्षेत्रावरील या कामांसाठी 12 कोटी 96 लाख 96 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे 70 कामांचे उद्दिष्ट असून, 4 कोटी 70 लाख 43 हजार रूपयांचा निधी त्यासाठी मंजूर करण्यात आला आहे. सामाजिक वनीकरण विभागाकडे अवघी तीन कामे सुपूर्द करण्यात आली असून, त्यासाठी 3 लाख 40 हजारांचा निधी मंजूर केला आहे. पंचायत समिती कृषी विभागाकडे 76 कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी 44 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
रत्नागिरी तालुक्यातील कामांसाठी 1 कोटी 44 लाख 52 हजारांचा निधी, लांजा तालुक्याकरिता 143 कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी 2 कोटी 65 लाख 25 हजार रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. राजापूर तालुक्यातील 98 कामांसाठी 1 कोटी 22 लाख 26 हजारांचा निधी मंजूर केला आहे.

चिपळूण तालुक्याला 195 कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी 2 कोटी 73 लाख 68 हजारांचा निधी मंजूर झाला आहे. गुहागर तालुक्यामध्ये एकूण 116 कामे करण्यात येणार असून, त्यासाठी 1 कोटी 30 लाख 50 हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. संगमेश्‍वर तालुक्यासाठी 202 कामांचे उद्दिष्ट असून, 2 कोटी 25 लाख 19 हजार रूपयांची निधी मंजूर झाला आहे.
दापोली तालुक्याला एकूण 99 कामांचे उद्दिष्ट असून, त्यासाठी 1 कोटी 32 लाख 48 हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. खेड तालुक्याकरिता एकूण 278 कामांचे उद्दिष्ट असून, 4 कोटी 15 लाख 2 हजाराचा निधी त्यासाठी मंजूर केला आहे. मंडणगड तालुक्यातील 55 कामांसाठी 1 कोटी 7 लाख 38 हजार रूपये इतका निधी मंजूर झाला आहे. मात्र, आता तिसरा टप्पा रखडण्याची चिन्हे असल्याने पाण्याची साडेसाती सुरू होणार आहे.