Fri, Apr 26, 2019 16:11होमपेज › Konkan › अणुऊर्जासह रिफायनरीविरोधी आंदोलन ताकदीने लढणार

अणुऊर्जासह रिफायनरीविरोधी आंदोलन ताकदीने लढणार

Published On: Mar 04 2018 1:42AM | Last Updated: Mar 03 2018 10:47PMराजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधी आणि रिफायनरी विरोधी आंदोलन एकत्रच मोठ्या ताकतीने लढायचा निर्धार जैतापूर अणुऊर्जाविरोधी जन हक्‍क सेवा समिती आणि कोकण रिफायनरी विरोधी संघर्ष समितीच्या संयुक्‍त बैठकीत करण्यात आला. जोपर्यत रिफायनरीसह जैतापूर अणऊर्जा प्रकल्प रद्द होत नाहीत तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धारही यावेळी करण्यात आला.

शिमगोत्सवानिमित्त सध्या जैतापूर व नाणार परिसरात मोठ्या प्रमाणात मुंबईकर चाकरमानी आले आहेत. त्यामुळे नाणार परिसरात होऊ घातलेल्या रिफायनरी व माडबन येथे होऊ घातलेल्या जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध करणार्‍या स्थानिक जनतेला एक बळ मिळाले आहे. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी सायंकाळी जैतापूर अणुऊर्जा विरोधी जनहक्‍क सेवा समिती तसेच कोकण रिफाईनरी विरोधी संघर्ष समितीची संयुक्‍त बैठक साखरीनाटे येथे येथे पार पडली साखरीनाटे जमातीतर्फे आयोजन करण्यात आलेल्या या बैठकीला कोकण विनाशकारी रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक वालम, जनहक्‍क सेवा समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण, मच्छीमार नेते अमजद बोरकर, सल्‍लागार डॉ. मंगेश सावंत आणि मंगेश चव्हाण, मन्सूर सोलकर, मलिक गडकरी, नदीम तमके आदींसह साखरी नाटे येथील मच्छीमार बांधव आणि सागवे परिसरातील महिला व कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी अशोक वालम यांनी आंदोलकांना आपल्या भाषणाने स्फूर्ती दिली. यापुढे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प विरोधी आणि रिफाईनरी विरोधी आंदोलन एकत्रित मोठ्या ताकतीने लढण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. रिफायनरीसह जैतापूर हे दोन्ही प्रकल्प रद्द होईपर्यंत हा लढा लढण्याचे अशोक वालम यांनी जाहीर केले.