Wed, May 22, 2019 22:52होमपेज › Konkan › फ्रान्स अध्यक्षांच्या भेटीमुळे  ‘जैतापूर’चा प्रश्‍न पुन्हा चर्चेत

फ्रान्स अध्यक्षांच्या भेटीमुळे  ‘जैतापूर’चा प्रश्‍न पुन्हा चर्चेत

Published On: Mar 07 2018 10:43PM | Last Updated: Mar 07 2018 10:21PMराजापूर : प्रतिनिधी

तालुक्यातील नाणार रिफायनरीचा मुद्दा चांगलाच गाजत असताना आता जैतापूर प्रकल्पाचा प्रश्‍न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकल्पाला अणुभट्ट्या पुरविणार्‍या फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युल मॅक्रो 9 मार्चपासून चार दिवसीय भारत भेटीवर येत असून त्यांच्या दौर्‍यात जैतापूर आराखड्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता गृहीत धरून सावध झालेल्या प्रकल्पविरोधकांनी दि. 10 मार्चला सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत मिठगवाणे येथील चिरेखाण येथे प्रकल्पविरोधात जाहीर सभा आयोजित केली आहे.

गेले काही दिवस जैतापूर प्रकल्पाचे वातावरण शांत होते;  पण फ्रान्सच्या अध्यक्षांच्या भारत भेटीच्या निमित्ताने का होईना जैतापूर पुन्हा जागा झाला आहे.  भारतातील सर्वात मोठा असा सुमारे 10 हजार मेगावॅट अणुऊर्जा प्रकल्प जैतापूर परिसरातील मिठगवाणे, माडबनसह 5 गावांत मार्गी लागत आहे.

प्रकल्पाविरोधात दहा वर्षांपासून संघर्ष 

हा प्रकल्प घातक असल्याच्या कारणावरुन गेले दशकभर जैतापूर परिसरात संघर्ष पहावयास मिळाला आहे. अनेकदा आंदोलने झाली. त्यातील काही तर हिंस्र स्वरुपाची होती. या प्रकल्पविरोधातील एका आंदोलनादरम्यान तबरेज सायेकर या आंदोलकाचा गोळी लागून मृत्यू झाला होता. त्यानंतर झालेली आंदोलने सावध स्वरुपाची होती. पण विरोध कायम होता व आजही आहे. गेल्या काही काळापासून रिफायनरीचे आंदोलने पेटल्याने जैतापूर शांत राहिले मात्र, फ्रान्सच्या अध्यक्षांच्या भारत भेटीने पुन्हा जैतापूरने उचल खाल्ली आहे.

फ्रान्सकडून भारताला या प्रकल्पासाठी अणुभट्ट्या व इंधन पुरवठा होणार आहे. सुरुवातीच्या काळात फ्रान्सच्या अरेवा कंपनीकडून ते रिअ‍ॅक्टर पुरविले जाणार होते. मात्र, नंतर ती कंपनी बदलण्यात आली व आता दुसर्‍या कंपनीला ठेका देण्यात आला असल्याची चर्चा सुरु आहे. त्या पार्श्‍वभूमीवर फ्रान्सचे अध्यक्ष भारत दौर्‍यावर येत असल्याने त्या भेटी दरम्यान जैतापूर प्रकल्पाबाबत काही करार होतील, अशी शक्यता आहे.

शिवाय जपानमधील फुकुशिमा दुर्घटनेलाही 7 वर्षे पूर्ण होत असल्याने जैतापूर प्रकल्प विरोधातील जनहक्‍क सेवा समितीच्या वतीने शनिवार दि. 10 मार्चला सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळात मिठगवाणे येथील चिरेखाणीजवळ अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध  दर्शवण्यासाठी सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण, मंगेश चव्हाण  यांच्यासह पर्यावरणवादी नेत्या वैशाली पाटील उपस्थित रहाणार असल्याची माहिती मंगेश चव्हाण यांनी दिली.

फ्रान्सच्या अध्यक्षांच्या भेटीदरम्यान खरोखरच जैतापूरबाबत कोणते करार होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे तर शनिवारच्या सभेत काय घडते, आंदोलनकर्ते प्रकल्प लादणार्‍या शासनाचा कसा समाचार घेतात याकडेही अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. फ्रान्सच्या अध्यक्षांच्या भारत भेटीने जैतापूर प्रकल्पाच्या आंदोलनाने पुन्हा एकदा उचल खाल्‍ली आहे. दरम्यान, रिफायनरीबरोबर जैतापूर आंदोलन सुरु होत असल्याने व अशी दोन आंदोलने सुरु राहिल्यास तालुक्यातील वातावरण संघर्षमय होणार आहे.