Sun, Apr 21, 2019 06:34होमपेज › Konkan › रिफायनरी, अणुऊर्जाविरोधी एकत्रित लढा?

रिफायनरी, अणुऊर्जाविरोधी एकत्रित लढा?

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

राजापूर : प्रतिनिधी

तालुक्यात रिफायनरीसह जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाची आंदोलने  एकाच छत्राखाली आणण्याचे जोरदार प्रयत्न सुरु झाले असले तरी  रिफायनरीच्या आंदोलकांकडून तशी  एकत्रित आंदोलने छेडण्याबाबत स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली नाही. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांविरुद्धची आंदोलने एकाच झेंड्याखाली होतील का, हाच खरा प्रश्न आहे .

कोकणाला वरदान लाभलेल्या समुद्र किनार्‍याचा आधार घेऊन शासनाने यापूर्वी जैतापूर परिसरात देशातील सर्वात मोठा असा दहा हजार मेगावॅटचा अणुऊर्जा प्रकल्प आणला होता. त्यानंतर आता जगातील सर्वात मोठा असा सुमारे अडीच हजार कोटी रुपयांचा रिफायनरी प्रकल्प नाणार गाव परिसरात मंजूर केला आहे.दोन्ही प्रकल्प हे येथील वनपर्यावरणाला घातक आहेत. त्यामुळे तालुक्यातील भातशेती, फळबागा, मच्छीमारी यासह मानवी जीवन यावर परिणाम होईल, या भीतीतून स्थानिक जनतेतून जोरदार विरोध सुरु आहे. त्यांपैकी जैतापूरचा संघर्ष तर मागील एक दशकाचा आहे. 

या पूर्वी काँग्रेस आघाडी शासन काळात जैतापूरचा अणुऊर्जा  प्रकल्प तालुक्यात आला होता. त्यावेळी स्थानिक जनतेसमवेत शिवसेनेने प्रखर विरोध करीत जोरदार आंदोलने केली होती. त्यातील काही आंदोलने तर हिंसक ठरली होती. त्यात तबरेज सायेकर हा आंदोलक पोलिसांच्या गोळीबारात मृत्यूमुखी पडला होता. मागील एक दशकाचा कालावधी राजापूर तालुक्याच्या पश्‍चिम भूमीने आंदोलने पाहिल्यानंतर जैतापूर प्रकल्पापासून काही अंतरावर नाणार परिसरात केंद्र व राज्य शासनाचा जगातील सर्वात मोठा रिफायनरी प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. हा प्रकल्पही पर्यावरणाला धोकादायक असल्याच्या कारणावरुन स्थानिक जनतेने संघटित होऊन विरोधात लढा सुरु केला आहे.त्यामुळे गेल्या काही महिन्यांत दोन पातळ्यांवर प्रकल्पांविरुद्धचे स्वतंत्र लढे उभारले गेले होते. मात्र, दोन्ही प्रकल्प येथील पर्यावरणाला घातक व धोकादायक असल्याने दोन्ही बाजूंच्या प्रकल्पग्रस्थांनी एकत्र येऊन व्यापक  लढा उभारायचा व संघटित लढा द्यायचा, असे प्रयत्न मध्यंतरी सुरु केले होते. पण, त्या प्रयत्नांना अजून यश आले नाही. अणुउर्जा तसेच रिफायनरी हे स्वतंत्र प्रकल्प असल्याने त्यांची आंदोलने देखील वेगवेगळी राहिली आहेत. त्यामुळे दोन्ही प्रकल्पांविरोधात लढा खरंच एकत्र होणार का, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

 Tags : Konkan, Konkan News, Jaitapur Nuclear Power Project, fights, Refinery


  •