Wed, Jul 24, 2019 05:49होमपेज › Konkan › ...अन्यथा आत्मदहन करणार

...अन्यथा आत्मदहन करणार

Published On: Mar 07 2018 10:43PM | Last Updated: Mar 07 2018 10:15PMरत्नागिरी : शहर वार्ताहर

प्रस्तावित जयगड-दाभोळ गॅस पाईपलाईन आपल्या वाडीतून न नेता ती पर्यायी जवळच्या मार्गाने न्यावी आणि  आमच्या घरादारांना उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे. अन्यथा आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा वाटद-कोडवाडी शेतकर्‍यांनी शासनाला दिला आहे. त्याशिवाय स्थानिक लोकप्रतिनिधी दबाव टाकत असून आपल्या जीवितास धोका असल्याने पोलिसांचे सहकार्य मिळावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

जयगड-दाभोळ गॅस पाईपलाईनला वाटद-कोडवाडी शेतकर्‍यांमधून प्रखर विरोध होत आहे. या विरोधाबाबत ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले आहे.  या निवेदनानुसार, कोेंडवाडीमध्ये सुमारे 300 लोकवस्ती असून प्रस्तावित जयगड-दाभोळ गॅस पाईपलाईन भरवस्तीतून नेण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतीसह राहत्या घरांनाही धोका निर्माण झाला आहे.  या वाडीत कुणबी समाजाची वस्ती असून शेती या प्रमुख व्यवसायावर या कुटुंबांचे जीवनमान आहे. मात्र शेती आणि राहते घर म्हणजेच अन्न आणि निवारा या दोन मुख्य मूलभूत गरजा शेतकर्‍यांपासून हिरावल्या जाणार आहेत. या भीतीपोटी शेतकर्‍यांनी आक्रमक धोरण पत्करले आहे. 

या पाईपलाईनचा पहिला सर्व्हे झाला त्यावेळी शेतकर्‍यांनी प्रखर विरोध केला होता. मात्र, तरीही शासनाचे प्रतिनिधी स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सोबत येऊन शेतकर्‍यांवर दबाब टाकण्याचा प्रकार सुरू असल्याची तक्रार या निवेदनात करण्यात आली आहे. काही ठिकाणी तर धमक्याही देण्याचे सत्र सुरू असल्याचे निवेदनात म्हटले असून शेतकर्‍यांच्या जीवितास धोका असल्याने पोलिसांचे सहकार्यही या निवेदनाद्वारे मागण्यात आले आहे. या निवेदनावर शेकडो शेतकर्‍यांनी स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

लोकप्रतिनिधीची धमकी; शेतकर्‍यांचा हिसका

प्रस्तावित जयगड-दाभोळ गॅस पाईपलाईन गावातून जाण्यासाठी निवडणुकीत पडलेला स्थानिक लोकप्रतिनिधी ग्रामस्थांवर दबाव आणत आहे. असाच एकेदिवशी दबाव आणल्याने शेतकर्‍यांनी त्याला हिसका दाखवला. आक्रमक शेतकरी पाहून या या पडेल लोकप्रतिनिधीने काढता पाय घेतला. दरम्यान, सर्व्हेसाठी येणारे अधिकारी या लोकप्रतिनिधीसह त्याच्या साथीदाराला घेऊन येत असल्याने शेतकरी आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत आहे. अधिकारी गुंडप्रवृत्तीच्या लोकप्रतिनिधींना घेऊन  गावात येत असल्याने याकडे शासनाने लक्ष देण्याचीही गरज आहे.