Mon, Jun 24, 2019 17:25होमपेज › Konkan › जगबुडी पूल मोजतोय अखेरची घटका

जगबुडी पूल मोजतोय अखेरची घटका

Published On: May 12 2018 1:29AM | Last Updated: May 11 2018 8:55PMखेड : अनुज जोशी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अत्यंत महत्त्वाचा असलेला भरणेनाक्यानजीकच्या जगबुडी नदीवरील ब्रिटिशकालीन पूल यंदाच्या पावसाळ्यात वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. या पुलाच्या बाजूलाच सुरू असलेले नवीन पुलाचे काम अतिशय संथगतीने सुरू असून पावसाळा काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने हा पूल धोक्याची घंटा देत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने पावसाळ्यात आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याची आवश्यकता आले. महामार्गावरील वाहन चालक जगबुडी पुलावरून जात असताना पुलाची परिस्थिती पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकतो. यामुळे सावित्री नदीवरील दुर्घटनेच्या आठवणी ताज्या होतात.

कोकणातील महाड येथील सावित्री नदीवरील जुना पूल मध्यरात्री कोसळून अनेकांचे प्राण गेल्यानंतर संपूर्ण देशात या घटनेमुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर सावित्री नदीवरील जुन्या पुलाच्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम काही महिन्यांमध्ये पूर्ण करण्यात आले. सावित्री नदीवरील पुलाच्या ठिकाणी वाहने मुंबईला जाण्यासाठी व गोव्याला जाण्यासाठी दोन स्वतंत्र पूल होते. त्यामुळे जुना पूल कोसळल्यानंतर देखील राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यात फारशा अडचणी आल्या नाहीत. परंतु, भरणेनाका नजीक असलेल्या जगबुडी नदीवरील एकमेव पुलावरून मुंबई ते गोवा वाहतूक सुरू असते. जगबुडी पुलावरून सन 2017 च्या पावसाळ्यात नदीला आलेल्या पुराचे पाणी गेल्यानंतर पूल वाहतुकीस धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पुलावरून एकाचवेळी दोन अवजड वाहने ये-जा करू शकत नसल्याने सध्या पुलावरून एखादे अवजड वाहन जात असताना दुसर्‍या बाजूने येणार्‍या वाहनांना पुलाच्या अलीकडेच थांबावे लागते.

जगबुडी पुलाच्या बाजूलाच चार वर्षांपूर्वी नवीन पुलाचे बांधकाम सुरू झाले आहे. मात्र, गेल्या चार वर्षांचा कालावधी उलटला तरी पूल वाहतुकीसाठी खुला झालेला नाही. सावित्री नदीवरील पूल चार महिन्यांत पूर्ण झाला. 

जगबुडीवरील पूल अजूनही अर्धवटच आहे. जगबुडी नदीपात्रापासून नऊ मीटर  अंतरावर नवीन पूल उभारण्यात येत आहे. दि. 2 ऑगस्ट 2016 रोजी सावित्री नदीवरील पूल कोसळला व लोकांचे प्राण गेल्यावर काही महिन्यांतच त्या पुलाच्या जागी नवीन पूल उभारून तो वाहतुकीस खुला करण्याची तत्परता बांधकाम विभागाने दाखवली. मात्र, दि. 19 मार्च 2013 रोजी जगबुडी पुलाच्या धोकादायक परिस्थितीमुळे एका खासगी प्रवासी वाहतूक करणार्‍या कंपनीची बस नदीपात्रात कोसळून 37 जणांचा मृत्यू झाल्यानंतरही हा पूल पूर्ण झालेला नाही.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील जगबुडी पुलाला धोका पोहोचल्यास महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी संबंधित विभागाकडे कोणताही पर्यायी मार्ग नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात पुलावरून लोकांनी जीवावर उदार होऊन वाहने चालवावीत, अशीच अपेक्षा महामार्ग बांधकाम विभाग करते आहे.