Thu, Jul 18, 2019 17:02होमपेज › Konkan › चिपी विमानतळावर १२ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय विमान!

चिपी विमानतळावर १२ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय विमान!

Published On: Aug 19 2018 11:05PM | Last Updated: Aug 19 2018 11:05PMवेंगुर्ले : शहर वार्ताहर 

चिपी विमानतळ सुरू होण्यासाठी आता कोणत्याही त्रुटी राहिल्या नाहीत. येत्या 12 सप्टेंबर रोजी ट्रायल बेसवर पहिले टेक ऑफ करण्यात येईल. तर, 12 डिसेंबर 2018 रोजी माल्टा येथून पहिले आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमान उतरेल, अशी माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी वेंगुर्ले येथील पत्रकार परिषदेत दिली. 

दोन दिवसांच्या वेंगुर्ले तालुका दौर्‍यादरम्यान पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शनिवारी परुळे, भोगवे येथील पर्यटन क्षेत्रांना भेट दिली, तर रविवारी चिपी विमानतळ, फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले, आरवली व आरोंदा अशा पर्यटन क्षेत्रांना भेट दिली. त्यानंतर सागर बंगला येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. वेंगुर्ले  सभापती यशवंत परब, शिवसेना तालुकाध्यक्ष बाळा दळवी, शहरप्रमुख विवेकानंद आरोलकर, नगरसेवक संदेश निकम आदी उपस्थित होते. 

 ना. केसरकर म्हणाले, येत्या 3 महिन्यांच्या कालावधीत चिपी विमानतळ परिसरात 300 ते 400 कॉटेजेस उभे करण्यात येणार आहेत. यासाठी स्थानिकांनी पुढे यावे. त्यांना 50 टक्के अनुदानावर निधी उपलब्ध करण्यात येईल. हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, उद्योगमंत्री सुभाष देसाई, खा. विनायक राऊत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांच्या सहकार्यामुळे चिपी विमानतळाचे  स्वप्न साकरल्याचे त्यांनी सांगितले. 

माल्टावरून पहिले आंतरराष्ट्रीय पातळीवरील विमान 12 डिसेंबरला उतरणार आहे. तसेच आठवड्यातून 3 दिवस आंतरराष्ट्रीय विमान उतरण्यासाठी एका कंपनीशी चर्चा झाली आहे. चिपी विमानतळाची धावपट्टी ही अडीच कि.मी. आहे व ती पुढे सव्वातीन किलोमीटर केली जाणार असल्याचे ते म्हणाले. विमानतळाच्या माध्यमातून येथील लोकांच्या घराघरांमध्ये छोट्या छोट्या स्वरूपाचे कॉटेज सुरू करून त्याद्वारे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी ज्या स्थानिकांच्या जमीन विमानतळासाठी संपादित झालेल्या आहेत अशांनी पुढे यावे. त्यांना 50 टक्के अनुदानावर निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

देशातील पहिलीच 26 सिटर पाणबुडी वेंगुर्ल्यात

महिन्याभरात 12 पैकी 8 क्‍वायर कारखाने सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा हा सधन जिल्हा होणार आहे. ‘जय जवान जय किसान’अंतर्गत आंबा, काजू, नारळ उत्पादक शेतकर्‍यांना यांत्रिकी सुविधा पुरवण्यात येतील. तसेच सावंतवाडी येथे एमपीएससी, यूपीएससी सेंटर सुरू करण्यात येत आहे. देशातील पहिलीच 26 सिटर पाणबुडीही वेंगुर्ले येथे दाखल होत आहे. या बोटीचे परदेशात बांधकाम सुरू आहे. तिचे बांधकाम पूर्ण झाल्यावर ती वेंगुर्लेत आणली जाईल. तसेच अ‍ॅग्रो टूरिझम, चिपी विमानतळ तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या संपूर्ण किनारपट्टीवरील भागात  विकासकामे केली जातील, अशी माहिती ना. केसरकर यांनी दिली.