Wed, Jul 17, 2019 18:05होमपेज › Konkan › वेंगुर्लेत 8 मेपासून आंतरराष्ट्रीय आंबा परिषद

वेंगुर्लेत 8 मेपासून आंतरराष्ट्रीय आंबा परिषद

Published On: May 03 2018 11:23PM | Last Updated: May 03 2018 10:56PMवेंगुर्ले ः शहर वार्ताहर 

बदलत्या वातावरणाचा आंबा उत्पादन क्षमतेवर होणारा परिणाम व त्यावरील संशोधनात्मक माहितीची देवाण-घेवाण जागतिक पातळीवर करण्यासाठी व शेतकर्‍यांना शाश्‍वत आंबा उत्पादन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली व इंटरडिसिप्लिनरी फॉर अ‍ॅडव्हान्समेंट ऑफ अ‍ॅॅग्रीकल्चर सायन्स अ‍ॅड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्‍त विद्यमाने प्रादेशिक फळ संशोधन केंद्र वेंगुर्ले येथे 8 ते 11 मे या कालावधीत आंतरराष्ट्रीय आंबा परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. आंबा परिषदेच्या निमित्ताने जगभरातील आंबा शास्त्रज्ञ, बागायतदार,व्यापारी व  विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची देवाण-घेवाण करण्याची संधी या परिषदेच्या माध्यमातून मिळणार आहे.

परिषदेमध्ये जागतिक पातळीवर आंब्याची सद्यस्थिती, वातावरणातील बदल, अनुवंशिकता आणि प्रजोत्पादन, अभिवृद्धी आणि नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन, शाश्‍वत उत्पादन आणि कृषी तंत्रज्ञान,पीक संरक्षण, काढणी पश्‍चात तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण, तंत्रज्ञानाचा प्रसार आणि कृषी अर्थशास्त्र, आंबा पिकातील निर्यात व सद्यस्थिती व भविष्यातील दिशा इत्यादी विषयावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. तसेच आंबा बागायतदार व शास्त्रज्ञ यांचे चर्चासत्र त्याचबरोबर कृषीविषयक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये आंब्याच्या विविध जातींचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. इच्छुक शेतकर्‍यांसाठी सुवर्ण कोकण फाऊंडेशन मुंबई यांच्या सहकार्याने प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. ही आंतरराष्ट्रीय आंबा परिषद आंबा बागायतदारांसाठी  तसेच शेतकर्‍यांसाठी  खास पर्वणी ठरणार असल्याचे प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. प्रदीप हळदवणेकर यांनी सांगितले.