Tue, Jun 25, 2019 21:46होमपेज › Konkan › हरकती असलेल्या इमारत बांधकामांचे फेरमूल्यांकन करा

हरकती असलेल्या इमारत बांधकामांचे फेरमूल्यांकन करा

Published On: Sep 02 2018 1:13AM | Last Updated: Sep 01 2018 10:54PMकणकवली : प्रतिनिधी

शुक्रवारी रात्री कणकवलीतील शासकीय विश्रामगृहावर सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी कणकवलीतील महामार्ग प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांचे निवेदन स्वीकारून त्यांचे म्हणणे जाणून घेतले. यावेळी ना. पाटील यांनी इमारत बांधकाम मूल्यांकनाबाबत ज्यांच्या हरकती आहेत त्यांचे फेरमूल्यांकन करावे, दराबाबत जे अपील करतील त्या अपीलात जिल्हाधिकार्‍यांनी त्यांना जो जास्तीचा दर असेल तो द्यावा, सर्व्हीसरोड कमी करण्याबाबत तांत्रिक सल्लागार व मुख्य अभियंता यांनी संयुक्‍त पाहणी करून त्याची फिजिबिलीटी पाहत अहवाल सादर करावा असे निर्देश दिले. भाडेकरूंना मोबादला मिळण्याबाबतच्या मागणीबाबत मात्र ना. पाटील यांनी ठोस आश्‍वासन दिले नाही. त्यामुळे बाधित भाडेकरूंनी नाराजी व्यक्त केली. 

या बैठकीवेळी पालकमंत्री दीपक केसरकर, आ.वैभव नाईक, भाजप माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, भाजप नेते संदेश पारकर, राजन तेली, जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे, मुख्य अभियंता विनय देशपांडे, महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी उपस्थित होते. 

यावेळी कणकवलीतील प्रकल्पग्रस्तांनी आपल्या विविध मागण्या ना. पाटील यांच्याकडे मांडल्या.बाधित प्रकल्पग्रस्त अनिल शेट्ये यांनी कणकवलीत 450 जणांना नोटीसा आल्या आहेत त्यातील 90 टक्के हे भाडेकरू आहेत. त्यांनाही भरपाई मिळायला हवी अशी मागणी केली. यावेळी ना. पाटील यांनी हा देश कायद्याने चालतो, भूसंपादन म्हणजे जमीन संपादीत करणे, त्यात भाडेकरूंचा विषय येतोच कुठे? असे सांगत अप्रत्यक्षपणे भाडेकरूंच्या मोबदल्याबाबत असमर्थता दर्शविली. यावेळी अनिल शेट्ये यांनी अनेक वर्षे असलेल्या भाडेकरूंना मोबदला देण्याबाबत सरकार तरतूद करणार नाही तर कोण करणार? असा सवाल केला. कणकवलीत सर्व्हीसरोड कमी केल्यास दुकानांचे नुकसान टळेल याकडेही काहींनी लक्ष वेधले. यावेळी ना. पाटील यांनी महामार्ग नियमानुसारच होईल, त्यात खुप बदल करणे शक्य नाही, तरीही याबाबतची फिजिबिलीटी तपासण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले. मूल्यांकनातील तफावतीबाबतही ना. पाटील यांचे लक्ष वेधण्यात आले.  कणकवलीतील प्रकल्पग्रस्तांचे जे प्रश्‍न आहेत त्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेवून चर्चा करा आणि अहवाल सादर करा असे निर्देशही ना. पाटील यांनी अधिकार्‍यांना दिले.  

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यावेळी कणकवलीतील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्‍न लवकरात लवकर सोडविण्याची मागणी केली.आ.वैभव नाईक, भाजप नेते संदेश पारकर, अतुल काळसेकर यांनीही काही मुद्दे मांडले.  मुंबई-गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी शाळा व कॉलेजेस असून त्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून काही बदल करावे लागतील. काही ठिकाणी बॉक्सवेल पुलाचीही गरज आहे. ओरोसमध्ये रस्ता खाली आणि सर्व्हीस रोड वर झाला आहे. त्याबाबतही योग्य ते बदल करावेत. कणकवली आणि कुडाळ या दोन शहरवासीयांचे विषय महत्त्वाचे आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या प्रश्‍नांबाबत कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नांबाबत शासन सकारात्मक असून कुणावरही अन्याय होणार नाही. डिसेंबर 2019 पर्यंत या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण केले जाईल. प्रकल्पग्रस्तांनीही शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन ना. पाटील यांनी केले. दरम्यान, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी कणकवलीतील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्‍नाबाबत लवकरात लवकर तोडगा काढला जाईल आणि येत्या 30 सप्टेंबर नंतर कणकवली शहरातील महामार्गाचे काम सुरू होईल, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले.