Mon, Sep 24, 2018 07:11



होमपेज › Konkan › संस्थांचा उपयोग गावच्या विकासासाठी करावा

संस्थांचा उपयोग गावच्या विकासासाठी करावा

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 8:32PM

बुकमार्क करा




सावंतवाडी : प्रतिनिधी  

जिल्ह्यात अनेक मंडळे उदयास येतात. मंडळ काढल्यानंतर त्याचे अस्तित्व टिकविणे गरजेचे आहे. क्रियाशील, प्रामाणिक कार्यकर्त्यांमुळेच मंडळे कायम टिकतात. मंडळांनी रोजगार निर्मिती करिता प्रयत्न करावेत. मुंबईकर चाकरमान्यांनी स्थापन केलेल्या मंडळे, संस्थांचा उपयोग गावच्या विकासासाठी करावा. तरच त्याचा उद्देश साध्य होईल, असे मत माजी मुख्यमंत्री तथा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी होडावडे येथे काढले. 

होडावडे ग्रामोन्नती मंडळ, मुंबईच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित होडावडा महोत्सव 2017 चे उद्घाटन नारायण राणे यांच्या हस्ते झाले. मंडळाचे कार्याध्यक्ष बी. एम. राऊळ, जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, मंडळाचे सचिव विठ्ठल मेस्त्री, उपाध्यक्ष संभाजी होडावडेकर,संदीप कुडतरकर, तालुकाध्यक्ष मनीष दळवी, खजिनदार उल्हास केरकर,पं.स.सदस्य पंकज पेडणेकर, ऋषिकेश धावडे, विनायक धावडे, मनोहर नाईक आदी उपस्थित होते. 

यावेळी राणे पुढे म्हणाले, मीही सर्वसामान्य गिरणी कामगार घराण्यातला आहे. त्यामुळे गरिबांच्या हाल, अपेष्टा माहीत आहेत. सर्वसामान्य जनतेसाठी मी प्रयत्न करणार आहे. मला मंत्रिपदाची आशा मुळीच नाही, कोकणी जनतेचा विकास करणे हे माझे ध्येय आहे. पण आज जनतेला विकास करणारे लोकप्रतिनिधी नकोत,  फक्‍त आश्वासने देणारे मंत्री पाहिजेत, अशी खंत व्यक्‍त  केली. 

मी कोकणात 1990 साली आलो. युती सरकारच्या काळात आमदार झालो. जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतला आणि जोमाने काम केले. सिंधुदुर्ग हा देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून निर्माण केला. त्याची यशस्वीता आपल्याला पहायला मिळत आहे. जिल्ह्यात पाण्याची उणीव भासू नये यासाठी 230 कोटींचा निधी मंजूर करून आणला. मुख्यमंत्री झाल्यानंतर जिल्ह्याचा विकास हाच माझ्या कामाचा केंद्रबिंदू होता.मंत्रिमंडळाचा अभ्यास असला तरच चांगले उपक्रम राबविले जाऊ शकतात.

मात्र, आताचे मंत्री काय करतात हे जनतेने बघावे,अशी टीकाही राणेंनी केली. यानिमित्त आयोजित रक्‍तदान आणि आरोग्य शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबई येथील तज्ज्ञ वैद्यकीय अधिकार्‍यांचा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. जुवेकर, डॉ. स्मिता केरकर, डॉ. भिवा नाईक, डॉ. गणपत टोपले, समीर सावंत यांचा समावेश होता. होडावडे ग्रामोन्नती मंडळाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले.