Fri, Jul 19, 2019 17:46होमपेज › Konkan › स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी आग्रही

स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी आग्रही

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

चिपळूण : शहर वार्ताहर

कोकणची संस्कृती, प्रगल्भता अधिक व्यापक होऊन कोकणच्या बुद्धीवैभवाची ओळख जगाला व्हावी यासाठी स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करावे, अशी मागणी केली जाणार असल्याची माहिती कोकणातील शैक्षणिक संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे यांनी शनिवार दि. 25 पत्रकार परिषदेत दिली.

चिपळूण येथील डी.बी.जे. महाविद्यालयात या संदर्भात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी संस्था नियामक समितीचे चेअरमन बाबू तांबे, माजी चेअरमन सुचय रेडीज, शैक्षणिक संस्था संघाचे कोषाध्यक्ष सुधीर दाभोळकर, देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत आदी उपस्थित होते. स्वतंत्र कोकण विद्यापीठाच्या मागणीची भूमिका स्पष्ट करताना संबंधितांनी सांगितले, कोकण हा नररत्नांचा प्रदेश मानला जातो.

लोकमान्य टिळक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, भारतरत्न पां. वा. काणे यांसारखे बुद्धीवैभव लाभलेली व्यक्‍तिमत्त्वे कोकणातीलच. ज्यावेळी स्वतंत्र कोकण बोर्डाची स्थापना झाली त्या वेळेपासून गेल्या पाच वर्षांचा निकाल पाहता राज्यात कोकणातील विद्यार्थीच सातत्याने वरचढ असल्याचे स्पष्ट झाले आहे. सद्य:स्थितीत कोकणला स्वतंत्र विद्यापीठाची गरज आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या कोकणवर सातत्याने अन्याय होत आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत सुमारे 750 महाविद्यालये संलग्‍न आहेत. परिणामी, प्रशासकीय कामाचा ताण, भोंगळ कारभार, खालावलेली कार्यक्षमता या सर्वाचा परिणाम विद्यापीठ कारभाराचे नियंत्रण गेले आहे.

रायगड ते सिंधुदुर्ग या कोकणातील जिल्ह्यांमध्ये 105 महाविद्यालये आहेत. कोकणात प्रगल्भ बुद्धीमत्ता आहे. या सर्वाला व्यापकता मिळवून देण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठाची गरज आहे. त्यातूनच कोकणातील संस्कार संस्कृती व स्वतंत्र अस्तित्त्व, व्यापक अभ्यासक्रम उपलब्ध होऊ शकतील. येथील विद्यार्थ्यांसह प्रशासकीय कारभारात सुलभता राहील. कोकणला पूरक अशा व्यवसायांचे अभ्यासक्रम सुरू होतील. त्यामध्ये पर्यटनासह समुद्र विज्ञान, जलवाहतूक आदींचा समावेश व वैज्ञानिक संशोधन अभ्यासक्रमांची केंद्र उभे करता येईल. या सर्वांचा प्राधान्याने विचार होण्यासाठी स्वतंत्र विद्यापीठासाठी जनतेच्या माध्यमातून शैक्षणिक संस्था शासनाकडे दबाव निर्माण करणार असल्याचे पाटणे यांनी स्पष्ट केले.

विद्यापीठाचे उपकेंद्र ही केवळ फसवणूक

मुंबई विद्यापीठाने कोकणसाठी सुरू केलेले उपकेंद्र ही केवळ फसवणूक आहे. उपकेंद्राच्या माध्यमातून कोणत्याही सेवा-सुविधेचा लाभ मिळत नाही. आवश्यक असणारा कर्मचारीवर्ग उपलब्ध नाही. या सर्व पार्श्‍वभूमीवर स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी शैक्षणिक संस्था चालक एकत्रित आलो आहोत. याला कोकणातील लोकप्रतिनिधींनी पाठबळ देऊन सरकारवर दबाव निर्माण करावा. राजकीय इच्छाशक्‍तीसाठी जनतेचाही सहभाग असावा. मत्स्य संशोधन विद्यालय नागपूरमध्ये ही एकप्रकारे कोकणची थट्टाच आहे, असे अ‍ॅड. पाटणे यांनी यावेळी सांगितले.