Fri, May 24, 2019 21:17होमपेज › Konkan › चिपळूण न.प. कारभाराची चौकशी सुरू

चिपळूण न.प. कारभाराची चौकशी सुरू

Published On: Dec 23 2017 2:06AM | Last Updated: Dec 22 2017 11:07PM

बुकमार्क करा

चिपळूण : शहर वार्ताहर

चिपळूण नगर परिषदेचा गेल्या आठ महिन्यातील कारभार तसेच वादग्रस्त मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांच्याविरोधात सुधार समितीसहीत नगरसेवकांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन अधिकार्‍यांचे पथक शुक्रवारी न.प.मध्ये दाखल झाले. या पथकाद्वारे या प्रकरणांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

चिपळूण न.प.चा गेल्या आठ महिन्यात झालेला वादग्रस्त कारभार, तसेच मुख्याधिकारी यांच्याबाबत चिपळूण शहर सुधार समितीसहीत भाजपचे नगरसेवक व उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, अपक्ष नगरसेवक अविनाश केळसकर, माजी नगरसेवक इनायत मुकादम, शिवसेना नगरसेवक मोहन मिरगल आदींनी विविध तक्रारी जिल्हाधिकारी यांच्याकडे नोंदविल्या. या तक्रारी गेल्या तीन-चार महिन्यांपासून निकालाच्या प्रतिक्षेत आहेत.

दरम्यानच्या काळात पालकमंत्री  रविंद्र वायकर यांनी देखील तक्रारींची दखल घेऊन चौकशीच मागणी केली. चिपळूणचे आ. सदानंद चव्हाण यांनीही तक्रारीची दखल घेत काही विषयांसंदर्भात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी दाखल केली. दोन दिवसांपूर्वी माजी नगरसेवक शिरीष काटकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शहर सुधार समितीने या संपूर्ण तक्रारींचा पाढा जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निदर्शनास आणला. चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी समितीच्या माध्यमातून पूर्ण करून पंधरा दिवसांत कार्यवाहीचे आश्‍वासन दिले. दोनच दिवसात जिल्हाधिकार्‍यांनी तक्रारींच्या चौकशीसाठी दांडेकर व श्रीमती नाईक या दोन अधिकार्‍यांची समिती चिपळूण न.प.मध्ये पाठवली. 

दरम्यान, मागील आठवड्यात याच विषयासाठी संबंधित समिती चिपळूण न.प.मध्ये दाखल झाली होती. मात्र, याबाबत सायंकाळी उशिरापर्यंत संबंधित तक्रारदारांना कळविले गेले नाही. समितीने काही वेळातच चौकशी आटोपून परतीचा मार्ग धरल्याची चर्चा न.प. वर्तुळात होत होती, तर शुक्रवारी  आलेल्या समितीने तक्रारदारांना तक्रारीसंदर्भात आपले म्हणणे वा स्पष्टीकरणासाठी बोलविले अथवा कसे ते समजले नाही. मात्र, संबंधितांना विचारले असता, आजच्या चौकशीत केवळ प्रशासकीय व न. प. कर्मचार्‍यांची चौकशी करणार आहोत, असे त्रोटक उत्तर दिले गेले. त्यामुळे पुन्हा एकदा तक्रारदारांना बोलविण्याचा विषय मागे पडल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. आता या चौकशी पथकाने चौकशी सुरू केल्याने न.प.चा खरा कारभार उघड होणार आहे. त्यामुळे याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.