Tue, May 21, 2019 00:04होमपेज › Konkan › लोकशाही खरोखरच धोक्यातः राज ठाकरे

लोकशाही खरोखरच धोक्यातः राज ठाकरे

Published On: Jan 12 2018 7:40PM | Last Updated: Jan 12 2018 7:40PM

बुकमार्क करा
रत्नागिरीः पुढारी ऑनलाईन

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्रकार परिषद घ्यावी लागल्याने निर्माण झालेल्या विचित्र परिस्थिती विषयी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितले कि, भारतातील लोकशाही खरोखरच धोक्यात चालली आहे. आपली वाटचाल अराजकतेकडे चालू असून ही बाब गंभीर आहे. आज रत्नागिरी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले कि, न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेणं हे लोकशाहीसाठी योग्य नाही. चार न्यायमूर्ती जे काही बोलले ते अत्यंत गंभीर आहे. लोकशाही आता खरोखरच धोक्यात आली असून न्यायव्यवस्थेत सरकारचा होत असलेला हस्तक्षेप किती मोठ्या प्रमाणात आहे, हे यातून समोर आले आहे.

'यापूर्वी निवडणूक आयोगही सरकार चालवतंय हे समोर आलं होतं, आता न्यायव्यवस्थेतीलही वास्तव समोर आलं आहे. हा देश केवळ अडीच माणसं चालवत आहेत' अशी टीका त्यांनी यावेळी केंद्र सरकारवर केली. येत्या काळात देशात धार्मिक दंगली घडवल्या जातील असे दिसत आहे. निवडणुकींच्यावेळी ईव्हीएम मशीन हॅक केली जातात हे स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले कि, शिवसेनेची भूमिका दुटप्पी आहे, कोकणात रिफायनरी येणार हे त्यांना आधीच ठाउक होतं, मग आता विरोध कशाला? लोक आधी विरोध करतात नंतर घरंगळत जातात, प्रकल्प यावेत की नको हे स्थानिकांनी ठरवावे.