Fri, Feb 22, 2019 16:11होमपेज › Konkan › भारताच्या एकात्मतेवर हल्ला होत आहे : संजय आवटे

भारताच्या एकात्मतेवर हल्ला होत आहे : संजय आवटे

Published On: Sep 10 2018 1:16AM | Last Updated: Sep 09 2018 8:06PMकणकवली : वार्ताहर

भारताच्या राष्ट्रवादाचे तत्त्व निखळ आणि निव्वळ भारतीय एकात्मतेत आहे. आताचे सरकार भारत नावाच्या कल्पनेवरच हल्ला करणारे आहे. धार्मिक धु्रवीकरणाचा अजेंडा घेऊन हे सरकार चालले आहे. निवडणुकांमध्ये ते आणखीन धार्मिकतावादी होईल, अशी भीती वी द चेंज आम्ही भारताचे लोक या पुस्तकाचे लेखक संजय आवटे यांनी व्यक्त केली. कणकवली येथे परिवर्तन परिषदेत ते बोलत होते. 

अखंड लोकमंच आयोजित परिवर्तन परिषद नगरवाचनालय सभागृहात झाली. यावेळी स्त्री सामाजिक कार्यकर्त्या विद्या भगत, शाहीर संभाजी भगत, रवीकांत तुपकर, सरफराज शेख आदी उपस्थित होते. अखंड लोकमंचचे अध्यक्ष नामानंद मोडक यांनी उपस्थितांचे शरद पाटील यांची पुस्तके देऊन स्वागत केले. 

संजय आवटे म्हणाले, गांधींना जन्म देणारा देश ही भारताची ओळख पुसून, गांधींचा खून करणार्‍यांचा देश अशी नवी ओळख व्हावी का? मनुस्मृतीचं दहन करून समतेचं संविधान देणार्‍या डॉ. बाबासाहेबांचा देश ही ख्याती पुसून,‘मुठभर मनुवाद्यांचा देश करायचा आहे का? ‘आधुनिकतेच्या वैश्‍विक आकाशाला गवसणी घालणार्‍या नेहरुंचा देश’, ही व्याख्या खोडून ‘अविवेकी, आक्रस्ताळ्या धर्मांधांचा देश’ आपल्याला करायचा आहे का? ‘बुद्धांचा देश’ आज अशा निर्बुद्धांचा देश होत असताना, हतबल होऊन हे सगळं आपण बघत बसणार आहोत का? या देशाचे अंतिम सत्ताधीश जनता आहे. त्यामुळे हा फैसला तुम्हाला करावयाचा आहे. कोणताही एक पक्ष किंवा एखादा नेत्याविरुद्ध दुसरा नेता असा हा फैसला नाही. गांधींचा भारत की नथुरामचा भारत? माझ्या भीमाचा भारत की ‘कोरेगाव-भीमा घडवणार्‍यांचा भारत?’ आयआयटी, एम्स, इस्रो उभारणार्‍या नेहरुंचा भारत की जिओ इन्स्टिट्युट ‘उभी’ करणार्‍यांचा भारत?...’ याचा फैसला झाला पाहिजे. ‘आम्ही भारताचे लोक’ काय करू शकतो, याचा पुरावा म्हणून इतिहासातील  या प्रकरणाकडे उद्या पाहिले जाणार आहे. इतिहासाचे साक्षीदार नव्हे केवळ, तर शिल्पकारही ठरण्याची ही वेळ आहे, असे आवाहन संजय आवटे यांनी केले.

स्त्री चळवळीचे अग्रणी विद्या बाळ यांनी हिंसा हे शूर आणि धैर्यवान माणसाचे लक्षण नाही असे सांगताना स्त्रीच्या नकाराचा विचार करायला शिका. कधीतरी स्त्री चुकत असेल म्हणून तिचे मुंडकेच कापून टाकायचे, तिची क्रूर हत्या करायची, बलात्कार करायचा ही वृत्ती माणुसकीची नाही. बळी तो कानपिळी ही पद्धत लोकशाहीची नाही.    शाहिर संभाजी भगत यांनी आपल्याशाहीरीनेच कार्यक्रमाची सुरुवात केली. या दरम्यान प्रस्तावनेत राजकीय आणि धार्मिक क्षेत्रात फार जपून वागावे. महाराज, बापू हे लोक खिसेकापू आहेत. हे पैसाचा खिसा कापत नाहीत तर डोक्याचा खिसा कापतात. बाबा, बुवा सांस्कृतिक भ्रष्टाचार करून आपल्याला फसवत आहेत असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन नीलेश पवार,प्रास्ताविक विवेक ताम्हणकर तर आभार विनायक सापळे यांनी मानले.