Tue, Jul 23, 2019 02:21होमपेज › Konkan › गावातील शेवटच्या घरापर्यंत बँक पोहोचवा : खा. राऊत

गावातील शेवटच्या घरापर्यंत बँक पोहोचवा : खा. राऊत

Published On: Sep 02 2018 1:13AM | Last Updated: Sep 01 2018 10:29PMरत्नागिरी : प्रतिनिधी

पोस्ट ऑफिसने सुरू केलेली इंडिया पोस्ट पेमेंटस् बँक ही प्रत्येकाच्या हक्‍काची आहे. आज या बँकेचे झालेले उद्घाटन हा क्षण देशाच्या इतिहासात सुवर्णक्षरांनी लिहिला जावा, असा आहे. अधिकाधिक कर्मचार्‍यांची नियुक्‍ती करून ही बँक गावातील शेवटच्या घरापर्यंत पोहोचवावी, असे आवाहन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खा. विनायक राऊत यांनी केले.

शहरातील हॉटेल विवेकच्या मराठा मैदान येथे शनिवारी इंडिया पोस्ट पेमेंटस् बँकेचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर आ. उदय सामंत, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जि. प. अध्यक्षा स्वरूपा साळवी, नगराध्यक्ष राहुल पंडित, शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके आदी उपस्थित होते. 

यावेळी खा. राऊत म्हणाले की, पोस्टाने सुरू केलेल्या बँकेच्या सुविधेमुळे ग्राहकांना घरबसल्या  बँकिंग व्यवहार करता येणार आहेत. त्याचा फायदा ग्रामीण भागातील ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात होईल. ग्रामीण डाकसेवक प्रतिकूल परिस्थितीत काम करत आहेत. त्यांना वेतनही कमी आहे. मात्र, बँक सुरू झाल्यानंतर त्यांचे वेतन वाढले असून यापुढे त्यांना नियमित वार्षिक वेतनवाढ मिळावी, यासाठी आम्ही प्रयत्न करू.

आ. उदय सामंत म्हणाले की, पोस्टमन या व्यक्‍तीला पूर्वीपासून अनन्य साधारण महत्त्व आहे. तो केवळ पोस्टाचा कर्मचारी नसून कुटुंबातीलच एक सदस्य आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सांगितले की, आर्थिक व्यवहार कॅशलेस करायचे असतील, डिजिटलच्या माध्यमातून व्यवहार करायचे असतील तर पोस्टाची ही बँक फारच उपयुक्‍त आहे. यामुळे तळागाळातही बँकेचे व्यवहार होतील. प्रशासकीय कर्मचार्‍यांचे वेतन खासगी बँकेत होते. हे वेतन पोस्टाच्या या बँकेतून करण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्‍वासन त्यांनी दिले.यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘स्पेशल कव्हर’, ‘माय स्टॅम्प’चे उद्घाटन झाले. 

वाटद, सोमेश्‍वर, सैतवडे,भाट्येत बँक सुरू

या बँकेचे मुख्य कार्यालय गाडीतळ येथील  टपाल खात्याच्या प्रधान कार्यालयात असून, रत्नागिरी तालुक्यात वाटद, सोमेश्‍वर, सैतवडे तसेच भाट्ये येथील पोस्टाच्या शाखा कार्यालयांतही ही बँक शनिवारपासून सुरू झाली.