Tue, Apr 23, 2019 09:37होमपेज › Konkan › भारत-अमेरिका नवे व्यापारी पर्व सुरू

भारत-अमेरिका नवे व्यापारी पर्व सुरू

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

शृंगारतळी : वार्ताहर / गुहागर : प्रतिनिधी

‘गेल’ने उभारलेल्या दाभोळ-बंगलोर गॅस पाईपलाईन आरजीपीपीएलच्या ताब्यातून विभक्‍त झाली आहे. त्याचे ‘कोकण एलएनजी प्रा. लि.’ असे नामकरण करण्यात आले  आहे. अमेरिकेतून आयात केलेला नैसर्गिक वायू ‘गेल’च्या जहाजातून दाभोळला दाखल झाला आहे. यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी संबंधाची नवी सुरुवात या कराराने झाली आहे, असे केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

अंजनवेल येथील ‘गेल’च्या प्रकल्पस्थळावर झालेल्या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत शुक्रवारी सकाळी ना. धर्मेंद्र प्रधान बोलत होते. त्यांच्यासोबत भारतीय अमेरिकेतील दुतावासातील वाणिज्य विभागातील  जॉईंट सेक्रेटरी होनावर व ‘गेल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी  बी. सी. त्रिपाठी उपस्थित होते.  ना. प्रधान यांनी ‘गेल’च्या अधिकार्‍यांसमवेत ‘एलएनजी’ जेटीसह अमेरिकेतून आलेल्या जहाजाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  भारत-अमेरिकेच्या व्यापारी करारानुसार भारताच्या ‘गेल’ कंपनीने अमेरिकेशी केलेल्या करारानुसार पहिले जहाज  पश्‍चिम किनारपट्टीवर अंजनवेल येथे दाखल झाले आहे.

अमेरिकेतून कायमस्वरूपी हे जहाज येत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘रत्नागिरी गॅस अ‍ॅन्ड पॉवर प्रा. लि.’ मधून ‘गेल’ची ही पाईपलाईन आता विभक्‍त झाली असून त्याचे नाव ‘कोकण एलएनजी प्रा. लि.’ असे असणार आहे. पाच मिलियन टन क्षमता असणारे हे टर्मिनल 10 मिलियन टन क्षमतेपर्यंत वाढविले जाणार आहे. भारतात यापुढे गॅसवर आधारित उद्योगधंदे उभारण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नियोजन आहे. गॅसवर आधारित ऊर्जा ही सर्वात स्वस्त, स्वच्छ व लाभदायक आहे. कोकण एलएनजी प्रा. लि. ही ‘गेल’ची उपकंपनी आहे. अंजनवेलनजीक अरबी समुद्रात 700 कोटी रूपये खर्च करून बे्रक वॉटर वॉल उभारण्याचीही कंपनीची तयारी असून त्यामुळे या जेटीवर बारमाही जहाजे गॅस घेऊन येऊ शकतील.  प्रतिवर्षी सुमारे 90 कार्गो या अमेरिकेच्या सबाईन पास व कोव पॉईंट एलएनजी टर्मिनल मधून येण्याची शक्यता आहे. सन 2017 च्या भारत अमेरिका व्यापारी करारानुसार 20 बिलियन व्यापारावरून 126.1 बिलियन एवढा व्यापार 2017 पर्यंत अपेक्षित आहे. सरकार गॅसवर आधारित अर्थव्यवस्था बनविण्यामध्ये पुढाकार घेत आहे, असे सांगितले. 

Tags : Konkan, Konkan News, India, America,  business, innings, start


  •