Tue, May 21, 2019 00:05होमपेज › Konkan › एसटीच्या भंगाराला लागलेली आग दुसर्‍या दिवशीही धुमसली

एसटीच्या भंगाराला लागलेली आग दुसर्‍या दिवशीही धुमसली

Published On: Feb 03 2018 11:24PM | Last Updated: Feb 03 2018 10:50PMरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी

टीआरपी येथील एसटी कार्यशाळेच्या भंगाराला शुक्रवारी दुपारी लागलेली आग शनिवारी दुपारपर्यंत धुमसत होती. शुक्रवारी ही आग विझविण्यासाठी 24 टँकरचे पाणी अग्‍निशामक दलाकडून वापरण्यात आले. तब्बल तीन तास ही आग विझविण्यासाठी रत्नागिरी नगरपरिषद आणि फिनोलेक्स कंपनीच्या अग्‍निशामक दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ केली. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी रात्री 8 वाजता आणि शनिवारी दुपारी 1 वाजता विझलेल्या भंगाराने पेट घेतला होता. यावेळीही  ‘रनप’ अग्‍निशामक दलाने धाव घेऊन आग आटोक्यात आणली.

एसटी कार्यशाळेतील भंगार सामानाच्या यार्डमधील रेक्झीन, फोम, टायर, प्लास्टिक बॅरल्स, ऑईलचे डबे तसेच लोखंडी आणि पत्र्याचे भंगार ठेवण्यात आले होते. शुक्रवारी दुपारी 1 वाजता या भंगारला आग लागल्यानंतर रत्नागिरी नगर परिषदेचे अग्‍निशामक घटनास्थळी दाखल झाले. तब्बल 24 टँकरमधील पाणी अग्‍निशामकात घेऊन आग विझविण्यात आली. त्याचबरोबर फिनोलेक्सच्या अग्‍निशामक दलानेही रनपच्या दोन टँकरमधील पाणी घेऊन आग विझविण्यात मोलाची मदत केली. तब्बल तीन तासांनंतर आग आटोक्यात आली.

विझलेल्या भंगाराने रात्री वार्‍यामुळे पुन्हा पेट घेतला. रात्री 8.45च्या सुमारास ‘रनप’च्या अग्‍निशामक दलाने घटनास्थळी जाऊन आग विझविली. त्यानंतर शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास पुन्हा पेट घेतला. यावेळीही ‘रनप’ अग्‍निशामक दलाने धाव घेऊन आग विझविली. त्यामुळे ही आग विझविण्यासाठी तब्बल 26 टँकरचे पाणी वापरावे लागले.