Fri, Nov 16, 2018 13:59होमपेज › Konkan › पक्षांचा राजा ‘मोरां’च्या संख्येत वाढ!

पक्षांचा राजा ‘मोरां’च्या संख्येत वाढ!

Published On: Jul 23 2018 11:13PM | Last Updated: Jul 23 2018 10:59PMसुरेश बागवे

 गेल्या काही वर्षांपासून परिसरात मोर व लांडोरांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांची वाढत असलेली   संख्या हे पर्यावरणाच्या दृष्टीने सुलक्षण व तमाम पक्षी मित्रांसाठी हर्षाची बाब असली तरी पक्षांचा हा  राजा आता शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करू लागल्याने शेतकरी मात्र अडचणीत सापडले आहेत.

साधारणतः तीस वर्षांपूर्वी परिसरात मोर अतिशय दुर्मिळ झाले होते. माळरानावर किंवा शेत शिवारात काही वेळा तुरळक प्रमाणात लांडोर पक्षी बागडताना दिसत. मात्र त्यांच्या कळपात मोर अभावानेच दिसे. तेव्हा लांडोरांची संख्याही फारच मर्यादित होती. मात्र अलीकडील काही वर्षांमध्ये मोर व लांडोरींच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. पूर्वी वाडी-वस्ती पासून दूर माळरानावर दबकत चरत असलेले हे पक्षी आता थेट वस्तीच्या नजीक असलेल्या शेतातही बिनदिक्कत चरत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. 

शासनाने शिकारीवर कडक निर्बंध आणल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत आता शिकारीच्या प्रमाणात लक्षणिय घट झाली आहे. तसेच नवीन विचारसरणीच्या तरूंणामध्ये पर्यावरणविषयक जागरूकता निर्माण झाल्यानेही शिकारीचे प्रमाण घटले आहे. याचबरोबर ग्रामीण भागातील लोकांची मानसिकताही या पक्षांच्या पथ्यावर पडली आहे. कित्येक गावांमध्ये मोर व लांडोरीची सहसा हत्या केली जात नाही. या पक्षांची हत्या न करण्याचे पुर्वापारपासून चालत आलेले संकेत काही गावांमध्ये आजही पाळले जात आहेत. त्यामुळेही मोर व लांडोर पक्षांच्या संख्येत पूर्वीच्या तुलनेत अनेक पटींनी वाढ झाली आहे.

शेतीचे मोठे नुकसान

मोर व लांडोर पक्षांची वाढलेली संख्या ही निश्चितच स्वागताहार्य बाब आहे. त्यांची वाढती संख्या हे पर्यावरणाच्या दृष्टीनेही सुलक्षण आहे. मात्र पक्षांचा हा राजा आता शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान करू लागल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.