Tue, Apr 23, 2019 02:07होमपेज › Konkan › कोकण विभाग धरण साठ्यात अव्वल

कोकण विभाग धरण साठ्यात अव्वल

Published On: Dec 03 2017 1:07AM | Last Updated: Dec 02 2017 8:31PM

बुकमार्क करा

रत्नागिरी : प्रतिनिधी

गतवर्षाच्या तुलनेत यावर्षी कोकणात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने अन्य विभागाच्या तुलनेत कोकणचे सिंचन क्षेत्र 1. 06 टक्क्यांनी वधारले आहे. यावर्षी अमरावती, नागपूर विभाग वगळता सर्वच भागात समाधानकारक पाऊस झाला. त्यामुळे पुणे आणि कोकण विभागातील सिंचन क्षेत्रात वाढ झाली असून कोकणातील सिंचनातील वाढ ही अन्य विभागाच्या तुलनेत अव्वल आहे.

सर्व पाटबंधारे प्रकल्पांवर पिण्याच्या पाण्याचा आरक्षणास प्रथम प्राधान्यक्रम देण्यात आले आहे. प्रत्येक प्रकल्पास पिण्यासाठी आवश्यकतेनुसार आरक्षण ठेवण्यात आले आहे. यावर्षी नागपूर व अमरावती महसूल विभागात तसेच मराठवाड्यातील औरंगाबाद विभागात दरवर्षीच्या तुलनेत कमी पाऊस पडल्याने काही प्रकल्पात पाणीसाठा कमी उपलब्ध आहे.  त्यानुसार प्रत्येक प्रकल्पावर पिण्याच्या पाण्याचे आरक्षणानंतर उर्वरित पाण्याचे रब्बी हंगामासाठी नियोजन करण्यात आले आहे. कोकणातही यासाठी प्रोत्साहित करण्यात कृषी विभागाने आघाडी घेतली आहे.

कोकणातील पाच जिल्ह्यांतील सिंचन क्षेत्रात गतवर्षाच्या तुलनेत एक टक्क्याने वाढ झाली आहे. गतवर्षी  कोकणातील उपयुक्त पाणीसाठा 94. 60 टक्के होता. यावर्षी हा साठा 1.06 टक्क्यांनी वाढून 95.66 टक्के झाला आहे. गतवर्षी कोकणातील धरणात ऑक्टोबरपर्यंत 3323 दलघमी उपयुक्त पाणीसाठ्याची नोंद झाली होती. यावर्षी हा साठा 3353 दलघमी एवढा नोंदविला आहे. 

पुणे विभागातही 0.30 टक्क्यांनी वाढ झाली आहे. अन्य विभागात मात्र पाऊस समाधानकारक झाला असला तरी गतवर्षाच्या तुलनेत जलसाठ्यात वाढ झालेली नाही. सर्वात कमी जलसाठा अमरावती विभागात असून कोकणातील पाचही जिल्ह्यांत उपयुक्त पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. दरम्यान, कोकणात दरवर्षी पाण्याचा साठा पुष्कळ होत असतो. तर बरेचसे पाणी हे वाहून जाऊन नदी-नाल्यांद्वारे समुद्राला मिळत असते. या सार्‍या पाण्याचे नियोजन झाले तर ते पाणी संपूर्ण कोकणच्या मातीसाठी उपयोगी ठरेल.