Thu, Jun 27, 2019 04:33होमपेज › Konkan › कामात हलगर्जीपणा ; ‘ग्रामीण’च्या २ पोलिसांचे निलंबन

कामात हलगर्जीपणा ; ‘ग्रामीण’च्या २ पोलिसांचे निलंबन

Published On: Jun 26 2018 1:14AM | Last Updated: Jun 25 2018 10:39PMरत्नागिरी : प्रतिनिधी

वृद्ध महिलेसह तिच्या मुलावर वार झाल्याची माहिती मिळूनदेखील तब्बल 16 तास उशिराने घटनास्थळी पोहोचणार्‍या ग्रामीण पोलिस ठाण्याचे  बीट अंमलदार, सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव आणि तत्कालीन ठाणे अंमलदार पोलिस नाईक सचिन धोपावकर या दोघांना  चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी सोमवारी केली.

काळबादेवी येथे राहणारे संतोष यशवंत मयेकर (वय 45) यांनी  आपला भाऊ विक्रांत मयेकर (42) आणि आई जयमाला यशवंत मयेकर (65, सर्व रा. मयेकरवाडी काळबादेवी) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. ही घटना मे 2018 मध्ये घडली होती. वडिलांच्या पेन्शनवरून त्याने भाऊ विक्रांत आणि आई जयमाला यांच्यासोबत भांडण सुरू केले. वाद इतके विकोपाला गेले की संतोष याने घरातील कोयता घेऊन दोघांवर हल्ला चढवला होता. कोयत्याचा घाव विक्रांतच्या डोक्यात बसल्याने विक्रांत रक्ताच्या थारोळ्यात कोसळला होता. काळबादेवीच्या पोलिस पाटलांनी जखमी जयमाला यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.बेभान झालेल्या संतोषने रात्रभर विक्रांत याला मारहाण केल्याचे आई जयमाला यांनी जिल्हा रुग्णालयात सांगितले होते.

जखमी अवस्थेत वृद्ध महिला दाखल झाल्यानंतर येथील डॉक्टरांनी पोलिस चौकीत कॉल दिला व महिलेवर हल्ला झाल्याचे पुढे आल्यानंतर चौकीतील पोलिस कर्मचार्‍यांनी  याची माहिती ग्रामीण पोलिसांना दिली. तसेच त्या महिलेच्या सांगण्यानुसार तिचा धाकटा मुलगा घरात बेशुद्ध पडला आहे, असेदेखील ग्रामीण पोलिसांना सांगण्यात आले होते. याची माहिती मिळाल्यानंतर  सहायक पोलिस निरीक्षक गुंडये जिल्हा रुग्णालयात दाखल झाले.

त्यांनी जखमी असलेल्या जयमाला मयेकर यांचा जबाब नोंदवून पोलिस ठाण्यात कळविला. मात्र, जयमाला यांनी आपल्या दुसर्‍या मुलाबाबत जी माहिती दिली. त्या माहितीवरुन घटनास्थळी पोहोचण्यासाठी ग्रामीण पोलिसांनी तब्बल 16 तासांचा अवधी लावला होता. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिस अधीक्षक प्रणय अशोक यांनी घेऊन हलगर्जीपणा करणार्‍या सहायक पोलिस निरीक्षक विजय जाधव आणि पोलिस नाईक सचिन धोपावकर यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत निलंबित करण्याचे आदेश दिले.