Fri, Jan 24, 2020 21:42होमपेज › Konkan › कुडाळ नगराध्यक्षांसह सत्ताधारी नगरसेवकांचे बेमुदत उपोषण

कुडाळ नगराध्यक्षांसह सत्ताधारी नगरसेवकांचे बेमुदत उपोषण

Published On: Jun 07 2019 1:50AM | Last Updated: Jun 06 2019 10:25PM
कुडाळ : शहर वार्ताहर
कुडाळ न.पं.च्या एमआयडीसी येथे प्रस्तावित घनकचरा निर्मूलन प्रकल्पाला एमआयडीसीने दिलेली स्थगिती उठवावी आणि भूखंड न.पं.च्या ताब्यात द्यावा, या मागणीसाठी कुडाळ नगराध्यक्षांसह सत्ताधारी नगरसेवकांनी गुरुवारपासून  एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले. दरम्यान, एमआयडीसीच्या अधिकार्‍यांनी चार वेळा उपोषणकर्त्यांशी चर्चा करीत उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र, ठोस निर्णय मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार करीत उपोषण सुरूच ठेवले. 

कुडाळ न.पं. क्षेत्रामध्ये दैनंदिन गोळा होणारा ओला व सुका कचरा याची विल्हेवाट लावण्यासाठी न.पं. कडे जागा नसल्याने न.पं.ने महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ, रत्नागिरी यांच्याकडे भूखंडाची मिळण्याची मागणी केली होती. त्यानुसार कुडाळ एमआयडीसी येथील भूखंड क्र. एच-171 येथील भूखंड न.पं.ला दिला आहे. या जागेमध्ये कचर्‍यापासून बायोगॅस व वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी एमआयडीसीला न.पं.कडून जागेची रक्‍कम अदा केली आहे. या जागेच्या पूर्ततेबाबत न.पं.कडून वारंवार पत्रव्यवहार झाले आहेत. मात्र, न.पं.च्या ताब्यात हा भूखंंड देण्यास एमआयडीसीकडून विलंब होत आहे. शिवाय एमआयडीसीने या प्रकल्पाला स्थगिती दिली आहे. एमआयडीसी अधिकार्‍यांच्या आडमुठेपणामुळे व वेळकाढू धोरणामुळे या प्रकल्पाचे काम प्रलंबित राहिल्याचा आरोप नगराध्यक्ष व नगरसेवकांचा आहे.  

या भूखंडाची जागा तत्काळ न. पं.च्या ताब्यात मिळावी आणि स्थगिती उठवावी या मागणीसाठी गुरूवारपासून हे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले. नगराध्यक्ष ओंकार तेली, उपनगराध्यक्षा सौ. सायली मांजरेकर, आरोग्य सभापती सौ. अश्‍विनी गावडे, बांधकाम सभापती सौ. सरोज जाधव, महिला व बालकल्याण सभापती सौ. साक्षी सावंत, नगरसेविका सौ. संध्या तेरसे, नगरसेवक आबा धडाम,राकेश कांदे यांनी उपोषणात सहभाग घेतला. स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्‍ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, माजी जि.प.अध्यक्ष विकास कुडाळकर, सौ. दीपलक्ष्मी पडते, सौ. अस्मिता बांदेकर, काँग्रेसचे प्रांतिक सदस्य काका कुडाळकर, शहर अध्यक्ष मंदार शिरसाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी अमित सामंत, तालुकाध्यक्ष भास्कर परब, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, विभाग अध्यक्ष दीपक गावडे, अपक्ष नगरसेवक एजाज नाईक,कुडाळ तालुका केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असो.चे सरचिटणीस दीपक परब, जिल्हा सहसचिव प्रसाद तेरसे, अ‍ॅड. राजीव बिले, सागर तेली, प्रणय तेली, मिलिंद नाईक, स्वरूप सावंत आदींसह दिडशेहून अधिक नागरिकांनी या उपोषणाला पाठींबा दर्शविला. 

एमआयडीसीच्या रत्नागिरी कार्यालयाचे अधिकारी हरी वेंगुर्लेकर व कुडाळचे उपअभियंता अविनाश रेवंडकर यांनी चारवेळा उपोषणकर्त्यांची भेट घेत चर्चा केली. तसेच वरिष्ठ कार्यालयाच्या अधिकार्‍यांशीही याबाबतची माहिती दिली. वरिष्ठ अधिकार्‍यांसोबत झालेल्या चर्चेनुसार 14 जून रोजी मुंबई येथे एमआयडीसी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, नगराध्यक्ष व नगरसेवक यांची एकत्रित बैठक घेऊन याप्रश्‍नी सकारात्मक तोडगा काढला जाईल. 

उपोषण सुरूच ठेवणार : तेली

तूर्तास उपोषण स्थगित करण्याची विनंती अधिकारी वेंगुर्लेकर यांनी नगराध्यक्ष तेली यांना केली. मात्र, जोपर्यंत ठोस निर्णय होऊन लेखी पत्र मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार नगराध्यक्ष तेली यांनी केला. आ. नितेश राणे यांनीही नगराध्यक्ष तेली यांच्याशी संपर्क साधत उपोषणाची माहिती घेतली.