Wed, Jul 17, 2019 07:58होमपेज › Konkan › सहकार क्षेत्रात राजकारण नको

सहकार क्षेत्रात राजकारण नको

Published On: Mar 25 2018 1:49AM | Last Updated: Mar 25 2018 12:16AMरत्नागिरी : प्रतिनिधी

सहकारात राजकारण आले की भ्रष्टाचार बोकाळतो. त्यामुळे सहकारात राजकारण असू नये. एखाद्या संस्थेच्या आजी-माजी पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन काम केले की एकसंधता टिकून राहते, असे प्रतिपादन सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतपेढीच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यासाठी ते रत्नागिरीत आले होते. यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्यात 7 हजार शिक्षक असून रत्नागिरीत कामानिमित्त येणार्‍या शिक्षकांची, विद्यार्थ्यांची राहण्याची सोय व्हावी, या उद्देशाने साडेतीन गुंठ्यांत 1 कोटी खर्च करून ही वास्तू उभारण्यात आली आहे. या वास्तूचा उद्घाटन सोहळा शनिवार आरोग्य मंदिर येथे झाला. यावेळी खा. विनायक राऊत, आ. उदय सामंत, पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप महाडिक, दिलीप देवळेकर, बकुळा माळी, बळीराम मोरे आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना ना. पाटील म्हणाले की, शिक्षकांकडून शक्यतो भ्रष्टाचार होत नाही. काही संस्था शिक्षकांच्या पैशाचा भ्रष्टाचार करतात. निवृत्तीनंतर मिळालेले पैसे बँका, पतपेढीत ठेवल्यानंतर या पैशांचा अपहार केला जातो. त्यामुळे शिक्षकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. मात्र, पतसंस्थेने एकसंधता राखत कार्य करावेे. 

या वास्तूत एक जनरल हॉल आणि मुले व पालकांना राहण्यासाठी दोन हॉल बांधण्यात आले आहेत. या दोन हॉलमध्ये 70 विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होऊ शकेल. त्याचबरोबर जनरल हॉलमध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यात येणार आहे. या वास्तूचे लोकार्पण करण्यात आले.

लग्‍नकार्यात मदत करण्याचे आवाहन

पतसंस्थेने आपल्या सभासदांच्या मुलांच्या लग्‍नकार्यासाठी 5 हजार रुपयांची मदत करावी. यातून संस्था आणि सभासद यांच्यातील नाते दृढ होईल. तसेच शेतकरी आणि शिक्षकाच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी मदत करावी करावी. ही संस्था आपली आहे, या भावनेतूनच याचे कार्य करावे,असेही ना. पाटील यांनी सांगितले.

 

Tags : Ratnagiri, Ratnagiri news, District Primary Teacher Co operative Credit Society, Inauguration,