Sat, Jul 20, 2019 23:58होमपेज › Konkan › रत्नागिरीत पाचव्या ग्रंथ महोत्सवाचे शानदार उद्घाटन

रत्नागिरीत पाचव्या ग्रंथ महोत्सवाचे शानदार उद्घाटन

Published On: Dec 18 2017 2:35AM | Last Updated: Dec 17 2017 8:16PM

बुकमार्क करा

हातखंबा : वार्ताहर

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अंतर्गत माध्यमिक शिक्षण विभाग आणि मिस्त्री हायस्कूल, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने मिस्त्री हायस्कूल येथे दि. 17 ते 19 या कालावधीत पार पडणार्‍या पाचव्या ग्रंथ महोत्सवाचे शानदार उद्घाटन जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. 

यावेळी जिल्हा परिषद शिक्षण व अर्थ समिती सभापती दीपक नागले, पंचायत समिती सभापती मेघना पाष्टे, उपसभापती सुनील नावले, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर आदी मान्यवरांसह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व विद्यार्थी-पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन मौलवी यांच्या कुरआन पठणाने, मिस्त्री हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या समूहगीताने व जी.जी.पी.एस. हायस्कूल, रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांच्या ग्रंथगीताने कार्यक्रम सुरु झाला. माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, उपशिक्षणाधिकारी महेश जोशी, ग्रंथ महोत्सव समन्वयक नथुराम देवळेकर यांनी गुलाबपुष्प व पुस्तक भेट देऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. 

प्रास्ताविकातून माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी तीन दिवस चालणार्‍या या ग्रंथमहोत्सवाचा उद्देश स्पष्ट केला. ग्रंथ महोत्सव कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक नथुराम देवळेकर यांनी आपल्या मनोगतातून तीन दिवसीय कार्यक्रमाचा आढावा घेतला. 

प्रमुख अतिथी प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, सभापती दीपक नागले यांनी ग्रंथ महोत्सव कार्यक्रमाच्या आयोजकांचे कौतुक केले.  आंबोकर म्हणाले की, 21 व्या शतकात वावरताना आज अत्याधुनिक तंत्रज्ञान इंटरनेटच्या बरोबरीने ग्रंथांचे वाचन व वाचन संस्कृती जोपासणे आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहा सावंत यांनी अध्यक्षीय भाषणात तीन दिवस सुरु राहणार्‍या जिल्हास्तरीय ग्रंथ महोत्सवातील विविध उपक्रमांचे कौतुक केले. यानंतर तीन दिवसीय चालणार्‍या या ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटन कार्यक्रमानंतर पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन ही मान्यवरांच्या उपस्थितीत यावेळी पार पडले. 

परिचर्चा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के यांच्या प्रमुख दुपारच्या सत्रात ‘वाचनातून लेखनाकडे’ या विषयावर सुनिल दबडे व ज्योती मुळ्ये यांनी सविस्तर चर्चा केली व एक सुंदर असा कार्यक्रम ऐकण्याची संधी रत्नागिरीकरांना यावेळी लाभली. ग्रंथमहोत्सवाच्या पहिल्या दिवशी संध्याकाळच्या सत्रात रत्नागिरी शहरातील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साही वातावरणात झाले. यावेळी शिवाजी महाराजांवर आधारित पोवाडे, शेतकर्‍यांच्या समस्या मांडणारे गीत, शिक्षणावर आधारित हसत खेळत शिक्षण इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम यावेळी पार पडले.  

उद्घाटन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथ महोत्सव नियोजन समितीचे सदस्य हुसेन पठाण यांनी केले. इम्तियाज सिद्दीकी यांच्या आभाराने उद्घाटनपर कार्यक्रमाची सांगता झाली. दिनांक 19 डिसेंबरपर्यंत चालणार्‍या या ग्रंथ महोत्सवाचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.