Tue, Mar 19, 2019 11:23होमपेज › Konkan › शिक्षक हा समाजाचा आदर्श, वंदनीय घटक : सभापती 

शिक्षक हा समाजाचा आदर्श, वंदनीय घटक : सभापती 

Published On: Mar 04 2018 1:42AM | Last Updated: Mar 03 2018 9:00PMसावंतवाडी : शहर वार्ताहर

शिक्षक हा समाजाचा आदर्श व वंदनीय घटक असून काही शिक्षकांनी हे पद प्राप्त केले आहे. सर्वच शिक्षक बंधूभगिनींनी समाज प्रेमाचा आदर्श पुरस्कार मिळवावा यासाठी शिक्षक वाड.मय चर्चा मंडळसारख्या सांस्कृतिक, साहित्यिक मंडळाचे घटक बनावे, असे मत पाचव्या शिक्षक साहित्य संमेलनात पं.स. सभापती रवींद्र मडगावकर यांनी व्यक्‍त केले.

सावंतवाडी तालुका स्कूल येथे कवी विजय पाताडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पाचव्या शिक्षक साहित्य संमेलनाचे उद्घाटन मालवणी कवी रुजारिओ पिंटो यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश म्हस्के, कार्यवाह अरुण गावडे, भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. मिलिंद भोसले, ज्ञानदीपचे संस्थापक वाय.पी. नाईक, सुरेश कुराडे, नारायण नाईक व शिक्षक वाड.मय मंडळाचे अध्यक्ष कवी विजय पाताडे यांनी शिक्षक मनातील कवित्वाचा, सामाजिक भानाचा व मराठी भाषा, मराठी शाळा व मराठीपणाचे नेतृत्व टिकविण्याबाबत घोषवार घेत शिक्षकांच्या समाज ओढीबद्दल कौतुक केले. 

यावेळी आयोजित शिक्षक कवी संमेलनात सहभागी शिक्षक कवीच्या उत्कृष्ट कविता निवडून सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये प्रथम शालिनी मोहाळे, द्वितीय श्‍वेतल परब, तृतीय - शशिकांत तांबे, उत्‍तेजनार्थ - सुनीता खाडे, ॠतुजा सावंत भोसले या कवींची निवड करण्यात आली. कवितांचे परीक्षण व आरतीचे संपादक प्रभाकर भागवत, वाय.पी.नाईक यांनी केले. याच संमेलनात कवी मनोहर परब, कवी किशोर वालावलकर यांना शिक्षक साहित्य कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच विशेष पुरस्कार देऊन बाबली चिलेना गौरविण्यात आले. प्रास्ताविक अध्यक्ष विठ्ठल कदम यांनी तर सूत्रसंचालन नीलम बांदेकर, प्रज्ञा मातोंडकर यांनी केले. आभार कवी मनोहर परब यांनी मानले.