Tue, Mar 19, 2019 05:09होमपेज › Konkan › ‘लाईफटाईम’ रुग्णालयाचा भव्य प्रारंभ

यापुढे जीवास मुकावे लागणार नाही : फडणवीस

Published On: May 28 2018 1:41AM | Last Updated: May 27 2018 10:21PMसिंधुदुर्गनगरी : प्रतिनिधी

सिंधुदुर्गसारख्या ग्रामीण जिल्ह्यात 650 बेडचे रुग्णालय उभारणे हे मोठे धाडसाचे काम आहे आणि अशी धाडसाची कामे केवळ नारायण राणेच करू शकतात. जगाच्या पाठीवर जे उपचार होतात तेच उपचार या रुग्णालयात होणार आहेत. आता यापुढे या जिल्ह्यातील जनतेला उपचाराविना जीवास मुकावे लागणार नाही, असा विश्‍वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्‍त केला.

माजी मुख्यमंत्री खा. नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाच्या लाईफटाईम हॉस्पिटलचे उद्घाटन आणि लोकार्पण रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाला. सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षणमंत्री विनोद तावडे, जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे, खा. तेंडोलकर, रमाकांत खलप, सुनील तटकरे, आ. अनिकेत तटकरे, गोव्याचे गृहनिर्माण मंत्री जयेश साळगावकर, नीलम राणे, आ. नीतेश राणे, माजी खा. नीलेश राणे, जि. प. अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डान्टस, लाईफटाईम रुग्णालयाचे डॉ. आर. एस. कुलकर्णी आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर व जिल्हावासीय  उपस्थित होते.

लाईफटाईम हॉस्पिटलचे उद्घाटन  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर आयोजित समारंभात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, नारायण राणे यांच्यासारखा एक चांगला नेता दिला. याबद्दल प्रथम या जिल्हावासीयांचे अभिनंदन आहे. ज्यांनी अशा प्रकारचे हे भव्य, जागतिक दर्जाचे अद्ययावत असे रुग्णालय तयार केले. हा त्यांचा धाडसी निर्णय आहे. अशा प्रकारचे रुग्णालय राणे यांनी मुंबईत सुरू केले असते तर त्यांना मोठा बिझनेस मिळविता आला असता. त्यांनी यासाठी घातलेल्या पैशाचा मोठ्या प्रमाणावर परतावा मिळाला असता. 

मात्र, त्यांना पैशापेक्षा आपल्या माणसांच्या प्रेमाचा परतावा महत्त्वाचा वाटला म्हणूनच त्यांनी या जिल्ह्यातील नव्हे तर कोकणातील लोकांसाठी हे भव्य आणि अद्ययावत असे रुग्णालय सुरू केले.

लवकरच मेडिकल कॉलेजही

आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे रुग्णालय तयार करताना प्रत्येक छोट्यातील छोट्या  गोष्टीचा बारकाईने विचार केलेला आहे. जगाच्या पातळीवर जे उपचार मिळतात ते सर्व उपचार याठिकाणी माफक दरात मिळणार आहेत. राणे यानी हे रुग्णालय व्यवसाय म्हणून नाही तर येथील लोकांची सेवा म्हणून सुरू केले आहे. आता या मेडिकल कॉलेजलाही लवकरच परवानगी मिळेल आणि हे मेडिकल कॉलेजही सुरू होईल आणि या कोकणातील हे 150 विद्यार्थी क्षमता असलेले पाहिले मेडिकल कॉलेजही सुरू होईल, असा विश्‍वास ना. फडणवीस यांनी व्यक्‍त केला.   या रुग्णालयात राज्य शासनाच्या आरोग्य विषयक सर्व योजना लागू करण्यात येतील, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कोकण आणि राज्यातील सर्वसामान्य जनतेला चांगले आणि जागतिक पातळीवरील उपचार मिळतील, अशी आशा  ना . फडणवीस यांनी व्यक्‍त केली.

या ठिकाणी रुग्ण हाच धर्म : शरद पवार

आजचा दिवस हा सिंधुदुर्गच्याच नव्हे तर संपूर्ण कोकणच्या दृष्टीने सुवर्ण अक्षराने लिहिण्यासारखा दिवस आहे.  नारायण राणे यांनी हे भव्यदिव्य आणि अद्ययावत रुग्णालय जिल्हावासीयांसाठी सुरू केले आहे.  आता येथील जनतेला उपचारासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता नाही.  या रुग्णालयात पक्ष , धर्म, जात पात  न पहाता केवळ रुग्णसेवा हाच धर्म असेल.

आम्ही सर्व सामजिक क्षेत्रात काम करणारी मंडळी त्यामुळे अशी रुग्णालये आदी चालविणे हे फार अवघड काम असते. यावर आपण ध्यान द्यावे असा सल्ला राणे यांना देतानाच या ठिकाणी लूटमार होणार नाही परंतु आजारपणावर योग्य उपचार होण्यासाठी आवश्यक असणारी माफक किंमत ही सर्वांना द्यावीच लागेल याची काळजी सर्वांनी घ्यावी, असे आवाहनही श्री. पवार यानी यावेळी जनतेला केले. 

रोजगार कार्यक्रम सुरू व्हावा : पवारांचा चिमटा

आता कोकणात फार मोठा फरक पडला आहे. यापूर्वी येथील लोक आपल्या उदरनिर्वाहासाठी मुंबईला जात होते. मात्र, आता मुंबईहून पुन्हा सिंधुदुर्गात येऊ लागले आहेत. जुन्या रोजगार हमी कार्यक्रमामुळे येथील लोक आंबा, काजू याचबरोबर बांबू लागवडीकडेही मोठ्या प्रमाणात लक्ष देऊ लागला आहे. त्यामुळे रोजगार निर्मितीत लक्षणीय प्रगती झाली आहे. त्यामुळे ती योजना पुन्हा सुरू करावी असे सांगत पवार यांनी मुख्यमंत्र्यांना राजकीय चिमटा काढण्याचाही प्रयत्न यावेळी केला. 

येथील माणूस  प्रेमळ तसाच स्पष्टवक्‍ता

हा सिंधुदुर्ग जिल्हा जसा निसर्गरम्य जिल्हा आहे. तसाच येथील माणूसही प्रेमळ आहे. मात्र, तेवढाच तो चिकित्सक आणि स्पष्टवक्‍ताही आहे. कोणी सरळ वागत असेल तर त्याच्यावर भरभरुन प्रेम करेल. पण जर काही चुकीचे झाले तर त्याचे काही खरे नाही, असे सांगत आपण राज्यात मंत्री असताना सरकारी कर्मचार्‍यांनी केलेल्या असहकार आंदोलना वेळचा एक सिंधुदुर्गातील किस्सा सांगितला आणि संपूर्ण सभागृहात हशाचे पिक उसळले.

प्रास्तविकात बोलताना खा. राणे यांनी सिंधुदुर्गात अद्ययावत हॉस्पिटल उभारणे हे माझे स्वप्न होते. ते आता पूर्णत्वास जात आहे. जिल्ह्यात एकही अद्ययावत हॉस्पिटल नसल्याने येथील रुग्णांना गोवा, मुंबई, कोल्हापूर येथे उपचारासाठी न्यावे लागत होते. यावेळी अनेक रुग्ण दगावल्याचे मी पाहिले होते. त्यामुळे मी हे स्वप्न पहिले होते. त्यानुसार 650 बेडचे हॉस्पिटल पडवे येथे उभारण्याचा मी निर्णय घेतला. हॉस्पिटलचे काम आता पूर्ण झाले आहे. त्यातील 300 बेडच्या हॉस्पिटलचे उद्घाटन 27 मे रोजी होत आहे. मी पाहिलेले स्वप्न पूर्णत्वास जात असल्याने मला समाधान वाटत आहे. जागतिक कीर्तीचे हे हॉस्पिटल होईल, असा विश्‍वास यावेळी खा. राणे यांनी व्यक्‍त केला. 

मेडिकल टुरिझमसाठी प्रयत्न

लाईफ टाईम हॉस्पिटलचा उपयोग मेडिकल टुरिझमसाठी करणार आहे. ज्या देशात मेडिकल टुरिझमची सुविधा नाही, त्या देशाशी बोलणी सुरू आहे. तेथील रुग्ण विमानाने आणून येथे त्यांच्यावर उपचार करण्यात येणार आहे. चिपी विमानतळाचे काम जूनमध्ये पूर्ण होईल, असे सांगण्यात येत आहे. सध्यातरी आम्ही गोवा विमानतळावरून रुग्ण आणण्याचे नियोजन केले आहे. चिपी विमानतळ सुरू झाल्यावर मेडिकल टुरिझमचे रुग्ण येथे आणण्यास सोईस्कर होणार आहे, असे खा. राणे यांनी सांगितले.  प्रत्येक तालुक्यात एक रुग्णवाहिका तेथील रुग्ण आणण्यासाठी ठेवणार आहोत. तसेच दोन वातानुकूलित रुग्णवाहिका ठेवणार असल्याचे खा. राणे यांनी सांगितले. 

चंद्रकांत पाटील म्हणाले, संपूर्ण कोकणपट्टयात कोणी कल्पना पण केली नसेल अशी ग्रामीण भागात भव्य हॉस्पिटल उभारण्याची कल्पना खा. नारायण राणे यांनी केली आणि ती साकारुन दाखविली. राणे यांना कुठलीही गोष्ट भव्य व नीटनेटकी करण्याची सवय आहे.  हे हॉस्पिटल गरीब रुग्णांसाठी आशेच स्थान निर्माण करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्‍त केली.

मी ‘आ’ वासून राहिलो

खा. राणे यांना मी अनेक वर्षे ओळखतो. त्यांना जवळून पाहण्याचा योग अलीकडे आला. त्यांना आपण करत असलेले काम भव्य व दिव्य करायला आवडते.  त्यासाठी त्यांचा आग्रह असतो. आज  प्रारंभ केलेले हॉस्पिटल पाहून मी ‘आ’ वासून राहिलो. थोडक्यात मी अचंबित झालो. इमारत व त्यातील सुविधा पाहून एकदा तरी आजारी पडावे, असे माझ्या मनात येऊन गेले, असे मिश्किल उद‍्गार ना. चंद्रकांत पाटील यांनी काढले.

कोकण विभागात असे हॉस्पिटल नाही

मुंबई वगळता नवी मुंबईपासून एकाच ठिकाणी एवढ्या जास्त प्रमाणात आरोग्य सुविधा असलेले तसेच जगातील सर्वोत्तम मशिनरी असलेले हॉस्पिटल पूर्ण कोकण विभागात नाही, असे गौरवोद‍्गार काढले. हे हॉस्पिटल म्हणजे रुग्णांना आशेचे किरण ठरेल, असा विश्‍वास ना.पाटील यांनी व्यक्‍त केला.