Sun, Mar 24, 2019 08:16होमपेज › Konkan › मळेवाड ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे जि.प.समोर बेमुदत उपोषण

मळेवाड ग्रामस्थ, विद्यार्थ्यांचे जि.प.समोर बेमुदत उपोषण

Published On: Aug 14 2018 1:07AM | Last Updated: Aug 13 2018 10:24PMओरोस : प्रतिनिधी

तळवडे माध्यमिक विद्यालयात विज्ञान शिक्षण देता मग मळेवाड हायस्कूलमध्ये विज्ञान शिक्षक नेमणूक का नाही, असा सवाल करत या प्रश्‍नी अन्याय होत असल्याने मळेवाड ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी सोमवारपासून जि.प.समोर बेमुदत उपोषण सुरू केले. संस्थेवर अंकुश कोणाचा? पंचक्रोशीतील विद्यार्थी क्रीडा, विज्ञान शिक्षणापासून वंचित राहतील त्याला जबाबदार कोण? इमारतीची दुरुस्ती कोण करणार? अशा प्रश्‍नांचा भडिमार करत ग्रामस्थांनी शिक्षणाधिकार्‍यांना धारेवर धरले. 

सिंधुदुर्गनगरी येथे जि. प. प्रवेशद्वारावर मळेवाड पंचक्रोशी हायस्कूलमधील ग्रामस्थ, विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले. हेमंत मराठे यांच्या नेतृत्वाखाली सुरू केलेल्या या उपोषणास जि. प. चे माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री. कडूस यांनी भेट दिली. आमच्या हायस्कूलला विज्ञान शिक्षक मिळावा, ही आमची मागणी असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यावर शिक्षणाधिकार्‍यांनी शिक्षक समायोजन रोस्टरचा निर्णय दाखविला असता असे कागदी घोडे आम्हाला नको, प्रत्यक्ष कार्यवाही हवी, असे सांगितले. उपोषणकर्त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे शिक्षणाधिकार्‍यांनी उपसंचालकांशी चर्चा करून शिक्षक नियुक्‍ती प्रश्‍न सोडविणार असल्याचे सांगितले. त्यानंतर जि.प.अध्यक्षा रेश्मा सावंत, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ यांनीही भेट घेऊन न्यायप्रश्‍नी चर्चा केली.

तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाचे मळेवाड पंचक्रोशी हायस्कूलमध्ये विज्ञान शिक्षक कायमस्वरूपी मिळावा. शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान होत आहे. या हायस्कूलमध्ये समायोजन करत असताना कायमस्वरूपी विज्ञान विषय शिकविण्यासाठी बीएस्सी बी.एड. शिक्षकाची मागणी होती. मात्र, समायोजनामध्ये चुकीची मागणी केल्यामुळे या हायस्कूलला विज्ञान विषय शिक्षक न मिळाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण शाळेतून दिले जात नाही. याची पाहणी शिक्षणाधिकार्‍यांनी करावी अशी मागणी करूनही त्यांची आजपर्यंत दखल घेतलेली नाही. मळेवाड पंचक्रोशी हायस्कूलमध्ये प्रयोगशाळेत प्रयोगासाठी आवश्यक उपकरणे पुरवावीत,  कायमस्वरूपी शिपाई नेमणूक करावा, मळेवाड हायस्कूलला देखभाल दुरुस्तीसाठी निधी मिळावा, आदी विविध मागण्यांसाठी हे बेमुदत उपोषण  असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.