Fri, Nov 16, 2018 04:36होमपेज › Konkan › मंत्र्यांच्या तालुक्यातच आरोग्य, शिक्षणाचा बोजवारा!

मंत्र्यांच्या तालुक्यातच आरोग्य, शिक्षणाचा बोजवारा!

Published On: Jul 28 2018 1:34AM | Last Updated: Jul 27 2018 11:22PMसूरज कोयंडे
 

देवगड तालुक्यामधील शिक्षण व आरोग्य खात्यांमधील अनेक रिक्‍त पदे आहेत. या दोन्हीही खात्याची दयनीय अवस्था झाली असून शिक्षण विभागातील शिक्षक पदे रिक्‍त असल्याने तालुक्यातील मुलांचे भवितव्य अधांतरी राहिले आहे. तर आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व अपुर्‍या सुविधा असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. या दोन्ही खात्याचे मंत्री देवगड तालुक्याचे सुपुत्र असून आपल्या तालुक्यामधील आपापल्या खात्यातील सुविधा देण्यास हे दोन्हीही मंत्री निष्क्रीय ठरले आहेत.

देवगड तालुक्यात 216 प्राथमिक शाळा आहेत. 1  ली ते 4 थी पर्यंतच्या 75 तर 1ली ते 7 वी पर्यंतच्या 141 शाळा आहेत. यामधील तब्बल 158 शिक्षकांची पदे रिक्‍त आहेत. यामधील 62 उपशिक्षक तर 96 पदवीधर शिक्षकांची पदे रिक्‍त आहे. याचा परिणाम तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणांवरती होत आहे. यामुळे या मुलांचे भवितव्य अधांतरी निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र शासनामधील शिक्षणमंत्री हे देवगड तालुक्यातील कुणकवण गावचे सुपुत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे हे असून त्यांच्याच तालुक्यातील शिक्षण विभागाची दयनीय अवस्था असणे म्हणजेच दुर्दैवाचीच बाब मानावी लागेल. त्यांनी आपल्या तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा सुधारावा या दृष्टिकोनातून त्यांनी शिक्षक पदे रिक्‍त राहणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे होते.मात्र, त्यांची तालुक्याविषयी आपल्या विकासाची मानसिकता नसल्यामुळे त्यांनी आपल्या तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. चार वर्षाच्या मंत्रीपदाच्या कारकिर्दीमधील शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आपल्या तालुक्याकडे कधीही जनतेच्या समस्या व येथील शिक्षणाच्या अडचणी कधीही समजून घेतल्या नाहीत. पश्‍चिम महाराष्ट्रातील व विदर्भातील मंत्री आपापल्या विभागातील आपला विकास आपल्या खात्यामार्फत जास्तीत जास्त कसा केला जाईल याची त्यांनी आस्था असते आणि त्याच दृष्टिकोनातून ते मंत्री महोदय आपापल्या तालुक्यात व आपापल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त निधी उपलब्ध करुन विकास करीत असतात. मात्र, देवगड तालुक्यातील दोन कॅबीनेट दर्जाचे मंत्री आपल्या तालुक्यात व आपल्या जिल्ह्यामध्ये विकास करण्यामध्ये निष्क्रीय ठरले आहेत.

तसेच देवगड तालुक्यातील वळीवंडे गावचे सुपुत्र असलेले आरोग्यमंत्री  डॉ.दीपक सावंत यांनीही तालुक्यात आवश्यक आरोग्य सुविधा निर्माण केल्या नाहीत. तसेच देवगड तालुक्यातील ग्रामीण रुग्णालये व प्राथमिक आरोग्य केंद्रामधील वैद्यकीय अधिकार्‍यांच्या रिक्‍त पदांवर नेमणुकाही वैद्यकीय अधिकार्‍यांचे करू शकले नाही ही चिंताजनक बाब आहे. यामुळे देवगड तालुक्याचे सुपुत्र असलेले शिक्षणमंत्री विनोद तावडे व आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे आपल्या तालुक्यातील आपापल्या खात्यांमधील विकास करण्यासाठी पूर्णपणे निष्क्रिय ठरल्याचे दिसून येत आहेत.