Tue, Jul 16, 2019 09:37होमपेज › Konkan › पारंपरिक वीट व्यवसाय संकटात 

पारंपरिक वीट व्यवसाय संकटात 

Published On: May 07 2018 2:02AM | Last Updated: May 06 2018 11:02PMआरवली : एस. एस. धुरी

आधुनिक काळात सिमेंटचा वापर अधिकाधिक वाढत असल्याने पारंपरिक मातीच्या विटा मागे पडू लागल्या आहेत. दिवसेंदिवस विटांची घटती मागणी पाहता वीट व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. हा वीट व्यवसाय आता नामशेष होण्याच्या मार्गावर असून वीट व्यावसायिक हतबल झाले आहेत . 

सिमेंट काँक्रिटच्या दुनियेत सिमेंटच्या वस्तू वापरण्याकडे लोकांचा अधिक कल आहे. त्यामुळे पूर्वीपासून वापरात असलेल्या या पर्यायी वस्तू आणि त्या तयार करणार्‍या व्यावसायिकांचा कल आता इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहे. कुंभार समाजातील अनेकांचा या वीटा तयार करून रोजीरोटी चालविण्याचा  व्यवसाय आहे. अनेक कुंभार बांधवांची गुजराण या वीट व्यवसायावरच आहे . त्यासाठी आपल्या मीठ-भाकरीच्या संसारासह इतर गावांमध्येही त्यांची अनेक  कुटुंबे जातात. त्यामुळे चार महिने अतिशय काबाडकष्टाच्या  या व्यवसायास आता सुरूवात झाली आहे . 

एका विटेला साधारणत: सात ते आठ वेळा हात मारावा लागतो. माती उत्कृष्टरित्या मळावी लागते आणि विटेच्या लाकडी साच्यामध्ये घालून या विटा काढाव्या लागतात . मग त्या पक्क्या स्वरूपात आणण्यासाठी भट्टीमध्ये भाजाव्या लागतात . एवढ्या सगळ्या प्रक्रियेत उन्हातान्हात कष्टाचे काम करूनही शेवटी चार हजार पाचशे रूपयांना एक हजार विटा असा दर मिळतो. त्यामुळे संपूर्ण कुटुंबास चार महिने केलेल्या मेहनतीला शेवटी पदरी निराशाच पडते. त्यात पुन्हा पावसाने व्यत्यय आणला तर सार्या व्यवसायावरच पाणी फिरते. त्यामुळे वीट व्यवसाय सध्या धोक्यात येत आहे. 

सिमेंट काँकिटच्या दुनियेत आता सिमेंटच्या विटांना वाढती मागणी आहे . त्यामुळे या मातीच्या भाजलेल्या विटांची मागणीही आता कमी होत आहे.  त्यामुळे कित्येक वीट व्यावसायिकांनी स्वत: उत्कृष्ट कारागीर व या व्यवसायात पारंगत असूनही या व्यवसायातील मालकीपणा बाजूला ठेवून स्वत: इतरांकडे मजुरीस जातात. फायद्यापेक्षा अधिक प्रमाणात तोटा व धोकाच या व्यवसायात पत्करावा लागतो.