Tue, Jun 25, 2019 22:08होमपेज › Konkan › शाळेच्या रजिस्टरमध्ये ‘मराठा’ खोडून ‘गाबित’ जातीची नोंद!

शाळेच्या रजिस्टरमध्ये ‘मराठा’ खोडून ‘गाबित’ जातीची नोंद!

Published On: Aug 14 2018 1:08AM | Last Updated: Aug 13 2018 10:18PMवेंगुर्ले : शहर वार्ताहर

वेंगुर्ले तालुक्यातील  जि. प. केंद्रशाळा होडावडा नं. 1 या शाळेतील जनरल रजिस्टर नोंद मध्ये चंद्रशेखर लक्ष्मण गिरप यांची जात मराठा नोंद असताना त्यात हेतुपूर्वक खाडाखोड करुन गाबित अशी नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाची  चौकशी करुन कारवाई व्हावी, अन्यथा आपण या विरोधात 15 ऑगस्ट रोजी वेंगुर्ले पंचायत समिती कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याचा इशारा वेंगुर्लेचे माजी नगराध्यक्ष सुनील शशिकांत डुबळे यांनी तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, शाळेच्या जनरल रजिस्टर नोंदीमधील ही खाडाखोड हेतुपूर्वक केली आहे. होडावडा शाळेत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपण वेंगुर्ले शाळा नं. 2 येथे प्रवेश घेतला. त्या शाळेतील नोंदीमध्ये माझी जात ‘मराठा’ असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे होडावडा शाळेच्या रजिस्टरमधील खाडाखोड ही अर्थपूर्ण व्यवहारातून झाल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मुख्याध्यापक,केंद्रशाळा होडावडा नं. 1 यांना शाळा सोडल्याच्या दाखल्याची सत्यता तपासून अहवाल सादर करणेबाबत पत्र दिले होत. या पत्राला उत्तर देताना संबंधित मुख्याध्यापकांनी जनरल रजिस्टरमध्ये खाडाखोड झालेल्या ठिकाणी शाईत बदल झाल्याची माहिती हेतुपूर्वक लपविली आहे. या प्रकरणाची त्वरित सखोल चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा आपण उपोषणाला बसणार असल्याचे श्री. डुबळे यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.