होमपेज › Konkan › ‘रिफायनरी’ संघर्षात ‘मनसे’चीही उडी

‘रिफायनरी’ संघर्षात ‘मनसे’चीही उडी

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 10:15PM

बुकमार्क करा
राजापूर : प्रतिनिधी

रिफायनरी प्रकल्पावरून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्‍वभूमीवर ‘मनसे’ अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेनुसार पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आ. बाळा नांदगावकर यांनी बुधवारी प्रकल्प परिसरात जाऊन स्थानिक जनतेची भूमिका समजावून घेतली. याबाबतचा अहवाल आपण पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांना सादर करू व त्यानंतर ‘मनसे’ची भूमिका जाहीर केली जाईल, अशी ग्वाही ‘मनसे’चे नेते व माजी आ. बाळा नांदगावकर यांनी दिली .

शासनाने राजापूर तालुक्यातील सागवे-नाणार परिसरात रिफायनरी प्रकल्प लादला असल्याचा आक्षेप घेत त्याला स्थानिक जनतेचा जोरदार विरोध आहे. हा प्रकल्प घातक व विनाशकारी असल्याच्या कारणावरून शिवसेनेसह, काँग्रेस, राष्ट्रवादीने या पूर्वीच प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. मात्र,  नेहमीच  विकासाला प्राधान्य देणारी ‘मनसे’या प्रकल्पाबाबत  कोणती भूमिका घेते, याबाबत निश्‍चिती झाली नव्हती.

त्या पार्श्‍वभूमीवर ‘मनसे’चे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार  बाळा नांदगावकर यांना प्रकल्प परिसरात जाऊन तेथील वस्तुस्थिती पाहण्यासाठी पाठवले त्यानुसार बुधवारी सकाळी नांदगावकर हे प्रकल्प परिसरात आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल झाले. कुंभवडे येथील गंभीरेश्‍वर मंदिरात ही बैठक पार पडली. यावेळी सुमारे 400 स्थानिक प्रकल्पविरोधक उपस्थित होते.