Wed, Jun 26, 2019 11:27होमपेज › Konkan › कार्यालय स्थलांतराने पं. स. कारभारी आक्रमक

कार्यालय स्थलांतराने पं. स. कारभारी आक्रमक

Published On: Dec 28 2017 1:31AM | Last Updated: Dec 27 2017 10:09PM

बुकमार्क करा
रत्नागिरी : प्रतिनिधी

जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा परिषदेतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या पर्यायी जागेत स्थलांतरित झालेल्या पंचायत समिती कार्यालयातील सामान माध्यमिक शिक्षण विभागाच्या इमारतीत हलवल्याने सभापती आणि सदस्य आक्रमक झाले. जेथे टेबल आणि खुर्च्यांची मांडणी करायलाच जागा नाही, तेथे आम्ही जनतेचा कारभार कसा हाकणार, अशी उद्विग्‍न भावना सीईओंपुढे व्यक्‍त करत पर्यायी जागेची मागणी करण्यात आली.

बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे पंचायत समितीत कर्मचारी दाखल झाले. मात्र, यावेळी त्यांना आपले टेबल आणि खुर्च्या तेथून माध्यमिक शिक्षण विभागाच्या वरच्या मजल्यावर हलवण्यात आल्याचे समजले तर सर्व दस्तऐवज आणि रेकॉर्डही कार्यालयाबाहेर आणून ठेवण्यात आले होते. ही बाब समजताच सभापती मेघना पाष्टे, उपसभापती सुनील नावळे, सदस्य गजानन पाटील, प्रकाश साळवी, साक्षी रावणंग, भैया भोंगले यांसह अन्य सदस्य तत्काळ पंचायत समितीत दाखल झाले. पंचायत समितीतील हलवलेल्या सामानाची माहिती घेतल्यावर त्यांनी तातडीने समोरील माध्यमिकच्या इमारतीकडे धाव घेतली. या इमारतीच्या वरच्या मजल्यावर पंचायत समितीतील सामानाची मांडणी करण्यात आली होती. 

दरम्यान, येथील परिस्थिती पाहून सभापती आणि सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली. मुळात पंचायत समितीच्या आठ विभागांचे कामकाज चालण्यासाठी ही जागा अपुरी आहे. सर्व जुने रेकॉर्ड आणि दस्तऐवज बाहेरच ठेवण्यात आले होते. खिडकीलगत कपाट ठेवण्यात आल्याने ‘व्हेंटिलेशन’ होत नव्हते. एका टेबलावरून दुसर्‍या टेबलावर जायचे असल्यास जागाही पुरेसी नव्हती. पुरुष आणि महिलांसाठी एकच स्वच्छतागृह होते. पंचायत समितीत 50 पेक्षा अधिक कर्मचारी असताना ही जागा अपुरी असून, येथील परिस्थिती कोंडवाड्याप्रमाणे असल्याची भावना यावळी  सदस्यांच्या मनात होती. 

यावेळी तातडीने घेतलेल्या पत्रकारी परिषदेत बोलताना पाष्टे यांनी सांगितले की, आम्हाला येथून पंचायत समितीचे कार्यालय हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. परंतु, तत्काळ यावर कार्यवाही होईल, असे वाटले नव्हते. पंचायत समितीच्या नवीन जागेचा सातबारा तयार झाला असून इमारत उभारण्याबाबतची प्रकिया सुरू आहे. येत्या दोन वर्षांत नवी इमारत बांधून तयार होईल. तोपर्यंत आम्हाला सुस्थितीतील सुटसुटीत पर्यायी जागा, किंवा भाडेतत्वावर जागा उपलब्ध करून द्यावी.

यावेळी सभापती पाष्टे आणि सर्व सदस्यांनी तत्काळ मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. यावेळी मिश्रा यांनी सांगितले की, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेची 50 लाख रुपये खर्चून इमारत बांधण्यात आली आहे. परंतु, अद्यापही या विभागाचे कामकाज भाड्याच्या जागेत सुरू आहे. नुकत्याच झालेल्या ऑडिटमध्ये याबाबत आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे ही इमारत त्यांच्या विभागासाठी मोकळी करून देण्यात आली.पंचायत समितीच्या कार्यालयासाठी पर्याप्त जागा मिळवून देऊ, असे आश्‍वासनही त्यांनी यावेळी दिले. यावेळी पाष्टे यांनी माध्यमिक विभागाच ग्रंथालय वरच्या मजल्यावर नेऊन खालच्या मजल्यावरील जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली.