Mon, Jun 24, 2019 20:59होमपेज › Konkan › खुल्या प्रवर्गातील ५४ उमेदवारांची एसटी चालक-वाहकपदी भरती होणार

खुल्या प्रवर्गातील ५४ उमेदवारांची एसटी चालक-वाहकपदी भरती होणार

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 10:47PMकणकवली : प्रतिनिधी

कोकण विभागात मार्चमध्ये 945 चालककम-वाहक पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये 70 जागा ओबीसी प्रवर्गातील होत्या. त्या सर्व जागा भरल्या. तसेच ओबीसी प्रवर्गातील जादा गुण मिळालेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून भरती करण्यात आले. त्यामुळे सिंधुदुर्ग विभागात खुल्या प्रवर्गातील 54 उमेदवार हे प्रतीक्षायादीत राहिले. त्यांना सामावून घेण्याबाबत राज्याचे परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष दिवाकर रावते यांच्याशी चर्चा केल्यानंतर महामंडाळाच्या संचालकांच्या बैठकीत या सर्व 54 उमेदवारांना चालककम-वाहक पदी सिंधुदुर्गात सामावून घेण्यास ना.रावते यांनी मान्यता दिली आहे, अशी माहिती आ.वैभव नाईक यांनी दिली. 

कणकवलीतील विजय भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. एसटी कामगार सेनेचे सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष संजय पडते, विभागीय सचिव गितेश कडू, कणकवली आगार कामगार सेनेचे अध्यक्ष प्रमोद मसुरकर उपस्थित होते. आ.वैभव नाईक म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हयात एसटी विभागात चालककम-वाहक पदाच्या अनेक जागा रिक्‍त होत्या. मार्च 2018मध्ये कोकण विभागात 945 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्हयातील 54 खुल्या प्रवर्गातील उमेदवार प्रतिक्षेत राहिले होते. याबाबत संजय पडते, गितेश कडू यांनी आपणाकडे तसेच खा.विनायक राऊत यांच्याकडे याबाबत विषय मांडला. त्यानंतर आम्ही ना.दिवाकर रावते यांची भेट घेतली.

सिंधुदुर्गात चालककम-वाहकाच्या अनेक जागा रिक्‍त आहेत. या जिल्हयात भरती झालेले अनेक परजिल्हयातील उमेदवार आपल्या जिल्हयात जाण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे जर प्रतिक्षायादीतील खुल्या उमेदवारांना सामावून घेतले तर त्यांच्यावरील अन्याय दूर होईल, हे म्हणणे ना.दिवाकर रावते यांना पटल्यानंतर या खुल्या प्रवर्गातील सर्व उमेदवारांना नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. विशेष म्हणजे प्रतिक्षा यादीतील उमेदवारांना घेतले जात नाहीत, मात्र ना.रावते यांनी प्रथमच हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. चालक पदाच्या चाचणीत दोनवेळा फेल झालेल्यांनाही पुन्हा एक संधी देण्यात आली. त्यामुळे या उमेदवारांना सामावून घेण्यात आले. ना.रावते यांच्या निर्णयामुळे खुल्या प्रवर्गातील प्रतिक्षा यादीतील 54 उमेदवारांना चालककम-वाहकपदी सामावेश होणार आहे.