Tue, May 21, 2019 22:15होमपेज › Konkan › येत्या दोन-तीन दिवसांमध्ये महामार्गावरील सर्व खड्डे भरणार

येत्या दोन-तीन दिवसांमध्ये महामार्गावरील सर्व खड्डे भरणार

Published On: Sep 09 2018 2:12AM | Last Updated: Sep 08 2018 10:37PMलांजा : प्रतिनिधी 

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील  पडलेले खड्डे बर्‍यापैकी भरले असून आणखी दोन-तीन दिवसांत सर्व खड्डे भरण्याचे काम पूर्ण होईल, असा विश्‍वास राज्याचे महसूल आणि बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केला.

महामार्गावरील पडलेल्या खड्ड्यांची पाहणी करण्यासाठी गेल्या आठवड्यात आल्यानंतर खड्डे भरले गेले की नाही, याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी ना. पाटील यांनी शनिवारी पुन्हा धावता दौरा केला.

ही पाहणी करण्यासाठी आलेले चंद्रकांत  पाटील यांनी लांजा शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना कामाच्या सद्य:स्थितीबाबत माहिती दिली. 

या वेळी ते म्हणाले गणेशोत्सवासाठी येणार्‍या भक्‍तांना प्रवासात त्रास सहन करावा लागू नये म्हणून मुंबई -गोवा मार्गासह मुंबई -पुणे पुणे-बंगळूर महामार्गांचा वापर करता यावा म्हणून या महामार्गावरील टोल या कालावधीत रद्द करण्यात आला असून हे मार्गदेखील पर्याय  मार्ग म्हणून उपलब्ध केले आहेत.

तसेच मुंबई-गोवा महामार्गावर प्रत्येक 50 कि. मी. अंतरावर एक टीम अशी संपूर्ण महामार्गावर गणेशोत्सवाच्या कालावधीत कार्यरत राहणार आहे. त्या त्या ठिकाणी पुन्हा पडलेले खड्डे त्वरित भरले जाणार आहे. गेल्या आठ दहा दिवसांत खड्डे भरण्याचे झालेले काम समाधानी असून कोणावर कारवाई करण्याचा प्रश्‍नच येत नाही. बर्‍यापैकी काम झाले आहे आणि अजून आमच्याकडे तीन दिवस आहेत त्यामुळे उर्वरित काम पूर्ण होईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

यावेळी उपस्थित पत्रकारांनी रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे पडले असून या रस्त्यावर अद्याप खड्डे भरले गेले नसल्याचे कारण विचारले असता त्यांनी याबाबतची काही कल्पना नाही. परंतु, आपण याची माहिती घेऊन जर का खड्डे भरले नसतील तर त्या ठिकाणीही तातडीने काम केले जाईल, हे कामदेखील गणेशउत्सवापूर्वी पूर्ण केले जाईल, असे सांगितले.