Mon, Nov 19, 2018 23:07होमपेज › Konkan › सेल्फीच्या नादात तिघेजण समुद्रात कोसळले

सेल्फीच्या नादात तिघेजण समुद्रात कोसळले

Published On: May 28 2018 1:41AM | Last Updated: May 27 2018 10:14PMमालवण : प्रतिनिधी

फोटोसेशन करत असताना अचानक समुद्राच्या लाटेत तिघे पर्यटक बुडाल्याची घटना रविवारी 2 वा. मालवण रॉक गार्डन परिसरात घडली. प्रदीप प्रकाश कदम (नालासोपारा, 38), मानसी विजय चव्हाण (19), दिशा विजय चव्हाण (13, रा.ठाणे) अशी या पर्यटकांची नावे आहेत. तिघे बुडत असल्याचे लक्षात येताच मानसी व दिशा यांचे वडील विजय कृष्णा चव्हाण, नातेवाईक राज चौकेकर या दोघांनी रॉक गार्डन परिसरातील समुद्रात उडी घेत त्या तिघांचे प्राण वाचविले. रॉक गार्डन येथे घडलेल्या घटनेने या ठिकाणी असलेल्या उपस्थित पर्यटकाची एकच धावपळ झाली. पर्यटक बुडाल्याची रॉक गार्डन येथील पहिलीच घटना आहे. बुडालेल्या पर्यटकाना मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून त्यांची तब्येत सुखरूप आहे.

मुंबई ठाणे येथील विजय कृष्णा चव्हाण हे पत्नी गीता विजय चव्हाण,  मुलगी मानसी विजय चव्हाण, दिशा विजय चव्हाण, व त्यांचे मेहुणे प्रदीप प्रकाश कदम, पत्नी मेघना प्रदीप कदम व सासू-सासरे अशा सातजण ठाणे येथून 23 मे रोजी पर्यटन सफरीसाठी कोकण दर्शनचे नियोजन केले होते. पर्यटन सफरीचा दहा दिवसांचा दौरा होता. महाड, मार्लेश्‍वर, गणपतीपुळे, रत्नागिरी येथे पर्यटन करुन   रविवारी हे सर्वजण रॉक गार्डन परिसरात दुपारी 2 वा. फिरण्यासाठी आले होते.

फोटो काढत असतानाच दुर्घटना घडली

रॉक गार्डन परिसरात समुद्रापासून काही अंतरावर असलेल्या काही खडकाळ भागात विजय चव्हाण यांच्या मुली मानसी व दिशा, प्रदीप हे फोटो काढत होते.़ फोटोसाठी समुद्री लाटांची वाट पाहत असताना अचानक समुद्राची उंच लाट खडकावर आदळली. या लाटेने मानसी व दिशा चव्हाण यांच्यासह प्रदीप कदम हे खडकावरून समुद्रत कोसळले.  हे दृश्य पाहून चव्हाण कुटुंबीय व उपस्थित पर्यटकांनी एकच आक्रोश केला.

मुली बुडत असल्याचे पाहून विजय चव्हाण व त्याचे नातेवाईक राज चौकेकर यांनी जीवाची तमा न बाळगता समुद्रात उडी घेतली. सर्वप्रथम दिशाच्या पायाला खेचून बाहेर घेतले.काही कालावधीत लाटांचा जोर कमी झाल्याने प्रदीप कदम व मानसी चव्हाण या दोघांना विजय चव्हाण व राज चौकेकर या दोघांनी तिघांना पाण्याबाहेर काढले.या तिघांचेही प्राण वाचविण्यात यश आले. यावेळी विजय चव्हाण यांच्या हाताला दुखापत झाली. बुडालेल्या तिघांना मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखलकरण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी तत्काळ उपचार केले.