Fri, Jan 24, 2020 23:29होमपेज › Konkan › अनाथांचा नाथ ‘माहेर’ घरात, तोही पर्यावरणपूरक स्वरूपात

अनाथांचा नाथ ‘माहेर’ घरात, तोही पर्यावरणपूरक स्वरूपात

Published On: Sep 14 2018 1:30AM | Last Updated: Sep 13 2018 8:27PMरत्नागिरी  : योगेश हळदवणेकर

ओमकार स्वरूपा सद‍्गुरू समर्था 
अनाथांच्या नाथा तुज नमो॥

या गाण्यातील अनाथांचा नाथ म्हणजेच गणराय. या गणरायाचे पर्यावरणपूरक स्वरूपात निराधार अनाथांच्या ‘माहेर’ या संस्थेत आगमन झाले. सात दिवसांचा हा गणेशोत्सव अनाथ, निराधारांच्या आयुष्यात मांगल्याचे दिन आणणारा ठरत आहे. अवघे कोकण गणरायांच्या आगमनाने पुलकित झालेले असताना निराधारांच्या चेहर्‍यावरचा आनंद गगनात मावणारा नव्हता.

माहेर संस्थेत 35 अनाथ निराधार मुले-मुली तसचे 60 निराधार महिला व पुरुष राहत आहेत. या सर्व उपेक्षितांना जगण्याचा आनंद घेता यावा, या उद्देशाने या संस्थेत विविध कार्यक्रम सण, उत्सव साजरे केले जातात. संस्थेच्या बालकांनी येथील अधीक्षक सुनील कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुबक पर्यावरणपूरक गणेशाची मूर्ती तयार करुन त्याची प्रतिष्ठापना केली आहे. एवढेच नाही तर मखर व सजावटही संस्थेत येणार्‍या निराधारांनी केली आहे. 

अनाथ, निराधार मुली-मुले तसेच निराधार महिला व पुरुषांसाठी कार्यरत असलेल्या माहेर संस्था येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा होत आहे.दरवर्षी एक नवा सामाजिक संदेश या सणाच्या निमित्ताने दिला जातो. यावर्षी स्वच्छतेचा संदेश देत हा सण साजरा होत आहे. केवळ उत्सव साजरा करायचा नाही तर त्यातून काही तरी सामाजिक संदेश द्यायचा, हाही हेतू त्यामागे दडलेला असतो. खर्‍याअर्थाने नियमात बसणारा असा गणेशोत्सव माहेर ही संस्था साजरा करीत आहे. कोणतेही उत्सवी स्वरूप नसताना केवळ निराधारांच्या आयुष्यात आनंद यावा, हा उद्देश ठेवून हा सण साजरा होतो, हे कौतुकास्पद आहे.हा उत्सव सात दिवस साजरा केला जातो. सकाळ-संध्याकाळ आरती, प्रसाद याचबरोबर संस्थेतील प्रवेशितांसाठी दरदिवशी एक वेगवेगळी स्पर्धा घेतली जाते. त्यांना संध्याकळच्या आरतीला बक्षीसही दिले जाते. गेली दहा वर्षे पर्यावरणास उपयुक्‍त असा तसेच समाजाला दिशा देणारा सण साजरा केला जातो.या उत्सवाच्या तयारीत संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे, मीरा गायकवाड, अमित चव्हाण, आशिष मुळ्ये,  शीतल हिवराळे, विजया कांबळे, शिल्पा डांगे, अनुदेवी राजपुरोहित, फुलाबाई पवार, सीता मिश्रा, मार्था पॉल, जोसेफ दास तसेच सर्व प्रवेशितांचे योगदान लाभले.