Sun, Jul 21, 2019 07:51होमपेज › Konkan › वेंगुर्ले शहरात आहे तीन वर्षांपासून प्लास्टिकबंदी!

वेंगुर्ले शहरात आहे तीन वर्षांपासून प्लास्टिकबंदी!

Published On: Jun 29 2018 12:06AM | Last Updated: Jun 28 2018 10:14PMवेंगुर्ले : नागेश पाटील

महाराष्ट्र राज्यात अखेरीस प्लास्टीक बंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी वेंगुर्ले नगरपालिकेने यापूर्वीच शहरात प्लास्टिक बंदी करून आपल्या शहरवासीयांना प्लास्टिक न वापरायची सवय लावलेली आहे. वेंगुर्ले नगरपरिषदेचे तत्कालीन आणि कार्यतत्पर मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी वेंगुर्ले शहरात आपल्या संकल्पनेतून नुसता प्लास्टिक बंदीच नाही तर त्याचे समूळ  निर्मूलन कसे करता येईल यासाठी विशेष कार्यक्रम हाती घेऊन गेली तीन वर्षांपूर्वीच हा उपक्रम यशस्वी करून दाखवला आहे. 

राज्य शासनाने आश्‍वासन दिल्याप्रमाणे संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी जाहीर केली आहे. या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे तर दुसरीकडे त्यावर टीकाही केली जात आहे. आता प्लास्टिक बंदी शासनाने केली असली तरी देशात स्वच्छतेत,पर्यटनात तसेच कित्येक उपक्रमांमध्ये पुढे असलेल्या वेंगुर्ले नगरपरिषदेने यापूर्वीच शहरात प्लास्टिक बंदी केली आहे.

तत्कालीन मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या विशेष मेहनतीला वेंगुर्लेवासीयांचे भरभरून सहकार्य मिळाले असून शहरात प्लास्टिक न वापरण्याचे आवाहन या न. प. ने करून त्याचे दुष्परिणाम व समूळ निर्मूलन करण्याकरिता विशेष कार्यक्रम हाती घेतले आहेत. राज्यात सर्वात प्रथम मुख्याधिकारी कोकरे यांनी दापोली नगरपंचायतीमध्ये सन 2010 मध्ये प्लास्टिक बंदी चळवळ राबवली. त्याला मोठ्या प्रमाणात यश आले. दापोली न.प. चा राज्य शासनाचे तत्कालीन पर्यावरण सचिव वल्सा नावर यांनी पत्र पाठवून कोकरे व दापोली नगरपंचायतीचे कौतुकही केले. 

सन 2010 ला दापोलीत राबवलेली प्लास्टीक मुक्‍तीची चळवळ वेंगुर्ले येथे मुख्याधिकारी पदावर कार्यरत असताना कोकरे यांनी एप्रिल 2015 मध्ये राबवून अवघ्या आठ दिवसात प्लास्टीक (50 मायक्रॉनपेक्षा अधिक जाडीचे प्लास्टिक पिशव्यावर बंदी आणली. प्लास्टिक वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करत त्याची कडक अंमलबजावणी देखील केली.

शहरात जमा होणारे वेगवेगळे प्रकारचे प्लास्टिक उर्वरित पँकेजिंग वेगळे घंटागाडीत संकलित करून त्यापासून रस्ते निर्मितीत करण्याचा प्रयोग करण्यात आला. वेंगुर्ले कॅम्प येथे प्लास्टिक वापरापासून रस्ता तयार करण्यात आला आहे. असा प्रयोग करणारी  वेंगुर्ले नगरपरिषद देशातील पहिली नगरपरिषद ठरली आहे. आजपर्यंत 20किमी.चे रस्ते बनवून वेस्ट प्लास्टिक पासून 7 लाख रुपयांचे उत्पन्‍न वेंगुर्ले न.प. ला मिळत आहे. समुद्र किनार्‍यावरील कचरा गोळा करून त्यावर वेंगुर्ले न.प. कडून प्रक्रिया केली जाते. महाराष्ट्रात नागरी घनकचर्‍यांमध्ये 20 टक्के प्लास्टिकचे प्रमाण असते. असे प्लास्टिक कुजत नाही,ते नष्टही होत नाही, त्यामुळे वर्गीकरण करण्यास अडथळा येतो. परिणामी ते जनावरांच्या पोटात जाऊन त्यांच्या जीवितास धोका उत्पन्‍न होतो. प्लास्टिकपासून जमीन नापिकी, नद्या, नाले, गटार तुंबणे यासारख्या समस्या देखील निर्माण होतात. त्यामुळे यापुढील काळात प्लास्टिकवर बंदी न आणल्यास त्याचे मोठे दुष्परिणाम नागरी भागात पहावयास मिळतील असे मत मुख्याधिकारी कोकरे यांनी व्यक्‍त केले आहे. वेंगुर्लेत प्लास्टिक बंदी उपक्रम राबवल्याबद्दल राज्य शासनाने यापूर्वीच वेंगुर्ले न.प. चा गौरव केला आहे.

आता प्लास्टिक बंदीला कायद्याचा धाक दाखवून दापोली, वेंगुर्ले पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवण्यात आला आहे. राज्यातील नगरपरिषद, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांना प्लास्टिक निर्मूलनाच्या दापोली तसेच वेंगुर्ले पॅटर्नबाबत पत्रे पाठवून तशा अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी पहिल्यांदा दापोली त्यानंतर वेंगुर्ले येथे पर्यावरणवादी नेते, संस्था, शाळा, पत्रकार आदी यंत्रणांना यात सामील करून घेऊन प्लास्टिक निर्मूलनाबाबत उत्तम जनजागृती केली आहे. शहरात यासाठी वेगवेगळी पथकेही तयार करण्यात आली. आवश्यक तेथे दंडात्मक कारवाई केली.

त्यामुळे गेली तीन वर्षात वेंगुर्ले शहरात प्लास्टिकचा वापर पूर्णपणे बंद झालेला आहे. आजही वेंगुर्ले शहरात व्यापारी, मच्छीविक्रेते ग्राहकांना प्लास्टिक पिशवीचा वापर करू देत नाहीत असे स्वागतार्ह चित्र बाजारपेठेत दिसते. प्लास्टिकवर चांदा ते बांदा मिळून  250 हून अधिक ठिकाणी या विषयावर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. त्यामुळे योगायोगाने राज्यात प्लास्टिक बंदी करण्यात आल्यामुळे वेंगुर्लेवासीयांनी देखील या निर्णयाचे स्वागतच केले आहे. एकंदरीतच दापोली त्या पाठोपाठ वेंगुर्ले व आता संपूर्ण राज्यात मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्या प्लास्टिक मुक्‍त शहर या चळवळीला यश आले असेच म्हणावे लागेल. 

खिल्‍ली उडविणार्‍यांना हे प्रश्‍न पडत नाहीत!

प्लास्टिक सर्जरी तरी चालेल का? मटणाला टोप घेऊन दुकानात जायचं का? असे नाना प्रश्‍न विचारुन प्लास्टिकबंदीची खिल्ली उडवणार्‍यांना दुसर्‍या देशांचे समुद्र किनारे पाहताना आपल्या देशाचे समुद्रकिनारे स्वच्छ का नाही असा प्रश्‍न पडत नाही का? पाहण्यातून एक फोटो गेला ज्यात मेलेल्या गाईच्या फाटलेल्या पोटात प्लास्टिकच्या पिशव्या आढळल्या त्या गाईच्या मृत्यूवर यांना कधी प्रश्‍न नाही पडला का? ती गायच काय तर असे कितीतरी प्राणी पक्षी समुद्री जीव या प्लॅस्टिकमुळे जीव गमावतात ते जीव महत्त्वाचे नाहीत का? असे अनेक प्रश्‍न प्लास्टिक बंदीच्या बाजूने असणार्‍या व स्वच्छतेचे आणि पर्यावरणाचे कास धरणार्‍या नागरिकांकडून विचारले जात आहेत.