Mon, Apr 22, 2019 16:37होमपेज › Konkan › ‘स्वाभिमान’ ताकदीनिशी लढणार

‘स्वाभिमान’ ताकदीनिशी लढणार

Published On: Mar 05 2018 8:56PM | Last Updated: Mar 05 2018 8:55PMदेवरूख : प्रतिनिधी

देवरूख नगर पंचायतीच्या दुसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. यासाठी उमेदवार निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक उमेदवारांनी 10 मार्चपर्यंत आपणाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुकाध्यक्ष बाळकृष्ण वनकर यांनी केले आहे.

कोकणचे नेते नारायण राणे यांनी काँग्रेसला ‘हात’ दाखविल्यानंतर राज्यभर दौरा करून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली आहे. याची मुहूर्तमेढ संगमेश्‍वर तालुक्यातही रोवण्यात आली असून तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि देवरूखचे माजी सरपंच बाळकृष्ण वनकर यांच्याकडे देण्यात आली आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीसंदर्भात पक्षाची अधिकृत भूमिका स्पष्ट करताना वनकर यांनी आमचा पक्ष नवीन असला तरी राणे साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते मात्र अनुभवी आणि जुनेच आहेत.

त्यामुळे आम्हाला ही पहिलीच निवडणूक लढविण्यात कोणतीच अडचण येणार नाही. देवरूखात 17 वॉर्डमध्ये होणार्‍या दुसर्‍या निवडणुकीत आम्ही वाडीवार दौरा सुरू केला असून वाडीला मान्य असलेला सुशिक्षित आणि योग्य उमेदवारच देण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. बर्‍याचशा प्रभागांतून एकापेक्षा जास्त उमेदवार इच्छुक आहेत तर नगराध्यक्षपदासाठीही दोघांनी इच्छा व्यक्‍त केली आहे. या पार्श्‍वभूमीवर पक्षाध्यक्ष नारायण राणे आणि सरचिटणीस माजी खासदार नीलेश राणे यांच्यासमोर यादी ठेवून त्यांच्या सहमतीनेच उमेदवार जाहीर केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शहरात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. देवरूखच्या निवडणुकीनंतर तालुकाभरात पक्ष विस्तारासाठी दौरा करणार आहोत. त्यासाठी आत्तापासूनच तयारी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. देवरूखची निवडणूक ही आमच्यासाठी प्रतिष्ठेची आहे. आजपर्यंत सत्तेत असलेल्यांनी शहराचा विकास केला नाही. आमचा पक्ष मात्र विकासाचा पक्‍का अजेंडा घेऊनच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. जनतेची कामे करणारे आणि सुशिक्षित तसेच प्रशासनाचा अनुभव असणारेच उमेदवार आम्ही देऊ, असा विश्‍वास त्यांनी व्यक्‍त केला.

देवरूखात या निवडणुकीत शिवसेना - भाजप स्वतंत्रपणे लढणार आहेत तर काँग्रेस - राष्ट्रवादीची आघाडी निश्‍चित झाली आहे. अशा स्थितीत स्वाभिमान पक्ष रिंगणात उतरल्यास ही लढाई चौरंगी होण्याची चिन्हे आहेत. वनकर यांनी केलेल्या घोषणेमुळे स्वाभिमानचे उमेदवार कोण असणार, याकडे देवरूखवासियांचे लक्ष लागून राहिले आहे.