Tue, Feb 19, 2019 05:59होमपेज › Konkan › जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Published On: Jun 05 2018 1:16AM | Last Updated: Jun 04 2018 10:56PMओरोस : प्रतिनिधी

माणगाव येथील एक इमारत जि.प. प्रशासनाने अनधिकृत घोषित केली. ती पाडण्याचे आदेश देऊनही कार्यवाहीस टाळाटाळ झाली. याच्या निषेधार्थ तसेच याबाबतची अतिरिक्‍त जिल्हाधिकार्‍यांसमवेत झालेली चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे वैफल्यग्रस्त होत माणगाव येथील सचिन सखाराम सावंत (वय 35) या तरुणाने सोमवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, याप्रकरणी सचिन सावंत याच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. 

माणगाव येथील सुलोचना सावंत यांची इमारत अनधिकृत असल्याने ती तोडावी, या मागणीसाठी सचिन सावंत हे गेले अनेक महिने निवेदन, आंदोलन, उपोषण आदी मार्गानी प्रयत्न करत आहेत. यापूर्वी त्यांनी माणगाव ग्रा.पं. कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते. त्यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी इमारत अनधिकृत घोषित करून ती पाडून टाकण्याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाला दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप इमारतीवर कारवाई झालेली नाही. यासाठी सचिन सावंत यांनी चार दिवसांपूर्वी जिल्हाधिकार्‍यांना लेखी निवेदन देत तत्काळ कार्यवाही न झाल्यास 4 जून रोजी आपल्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.

असा इशारा देवूनही इमारतीवर काहीच कार्यवाही न झाल्याने सचिन सावंत हे सोमवारी दुपारनंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. त्यानंतर त्यांनी अतिरिक्‍त जिल्हाधिकार्‍यांशी याबाबत चर्चा केली. मात्र चर्चा समाधानकारक न झाल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच अंगावर रॉकेल ओतून घेतले.  हा प्रकार पाहून उपस्थित पोलिसांनी त्याच्याकडे धाव घेतली. त्याने पुढील पाऊल उचलण्यापूर्वीच पोलिसांनी त्याच्याकडील रॉकेलचा कॅन हिसकावून घेत त्याला जेरबंद केले. सोमवारी सायं. 4 वा. सुमारास हा प्रकार घडला. 

पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सचिन सावंत याने ‘मला न्याय द्या, मला जगायचे नाही, कुठे आहेत लोकप्रतिनिधी? कुठे गेली कारवाईची आश्‍वासने? अशी ओरड मारू लागला. पोलिसांनी त्यांना व्हॅनमध्ये कोंबत ओरोस पोलिस स्थानकात नेले. तेथे त्यांच्यावर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस निरीक्षक मंदा पाटील, पी.ए. होडावडेकर, शशीशेखर प्रभू आदींनी ही कारवाई केली.