होमपेज › Konkan › तीन मंत्री असूनही खेड दरवर्षीच तहानलेले

तीन मंत्री असूनही खेड दरवर्षीच तहानलेले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

खेड : प्रतिनिधी

केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते, राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम व रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर हे या खेड तालुक्याचेच रहिवासी आहेत. परंतु, गेल्या कित्येक वर्षांपासून या तालुक्यात उन्हाळ्यात पाणीटंचाईग्रस्त म्हणून ओळखल्या जाणार्‍या भागाची ओळख पुसण्यात या सगळ्यांनाच अपयश आले आहे.

शासनाने तालुक्यातील चिंचवली ढेबेवाडी व खोपी रामजीवाडी-जांभूळवाडी या ठिकाणी बुधवार दि.28 पासून टँकरने पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केली आहे. कोट्यवधीच्या रूपयांच्या पाणी योजना व धरणे होऊनदेखील दरवर्षी उन्हाळ्यात पाणीपुरवठ्यासाठी टँकरवर अवलंबून रहावे लागत आहे. 

उन्हाळा सुरू झाला की पाणी टंचाई जिल्ह्यात सर्वप्रथम खेड तालुक्यातील काही गावांमध्ये पाणी टंचाई भेडसावू लागते. सन 2017 मध्येदेखील फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यात खेड तालुक्यातील चिंचवली ढेबेवाडी येथे पाणीटंचाई निर्माण झाली होती. परंतु, केवळ टंचाईच्या काळात टँकरने पाणीपुरवठा केल्यानंतर कोणतीच उपाययोजना येथे करण्यात आली नाही. त्यामुळे यावर्षीदेखील पाणी टंचाई भासू लागली आहे. त्यांनी टँकरने पाणीपुरवठ्याची मागणी केली आहे.

पाहणी केल्यानंतर शासकीय टँकरने पाणीपुरवठा बुधवार दि.28 पासून सुरू करण्यात आला. चिंचवली ढेबेवाडीसह खोपी मार्गावरील रामजीवाडी या गावाने मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात अर्ज दाखल केला. सध्या स्थानिक प्रशासनाकडे 4 गावांतील 9 वाड्यांकडून टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची मागणी करण्यात आली आहे. परंतु, शासकीय टँकर उपलब्ध नसल्याने उर्वरित ठिकाणी खासगी टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. खेड तालुक्यातील आंबवली भिंगारा, जांभूळवाडी, देवसडे वैरागवाडी, सावंतवाडी, मधलीवाडी, बौद्धवाडी, कदमवाडी या वाड्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा प्रशासनाला शक्य झालेला नाही.

Tags : Konkan, Konkan News,  summer,  water supply, depends, water tankers


  •