Fri, May 24, 2019 08:48होमपेज › Konkan › सिंधुदुर्गात ‘लोकसहभागातून पर्यटन विकास’साधणार

सिंधुदुर्गात ‘लोकसहभागातून पर्यटन विकास’साधणार

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 20 2017 8:56PM

बुकमार्क करा

नागपूर : काशिराम गायकवाड/राजाराम परब

सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकसहभागातून पर्यटन विकास साधला जाणार आहे. राज्यात प्रथमच सिंधुदुर्गात हा पथदर्शी प्रकल्प प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत असून चांदा ते बांदा व स्वदेश दर्शन योजनेतून यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. भूमिपुत्रांची जमीन व शासनाचा निधी,असा समन्वय साधत ‘लोकसहभागातून पर्यटन विकास’ या धर्तीवर जिल्हा पर्यटनाचा सर्वांगीण विकास साधला जाणार आहे, अशी माहिती गृहराज्यमंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. दीपक केसरकर यांनी दिली. हा प्रकल्प जिल्ह्यात यशस्वी झाल्यास राज्यभर या योजनेचा विस्तार केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

नागपूर येथील विधानभवनाच्या हिवाळी अधिवेशन दरम्यान मंगळवारी त्यांनी आपल्या दालनात सिंधुदुर्ग-कुडाळ येथील पत्रकारांशी संवाद साधला. ना. केसरकर पुढे म्हणाले, पर्टनमंत्री ना.रावल यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला आहे. त्यानंतर एमटीडीसीची बैठक झाली. राज्याच्या पर्यटन विभागामार्फत या योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नापणे, सावडाव, भोगवे,निवती, आरोंदा, यशवंतगड या पर्यटन स्थळांचा प्रामुख्याने समावेश असणार आहे.

यासाठी चांदा ते बांदा योजनेतून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.  उर्वरित पर्यटन स्थळांच्या विकासासाठी स्वदेश दर्शनमधून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिन्याभरात या योजनेला मान्यता मिळाल्यानंतर हा प्रकल्प लवकरच सुरू करण्यात येणार आहे. यातून मिळणारे उत्पन्‍न जमीन मालक व पर्यटन विकास महामंडळ यांच्याकडे विभागले जाणार आहे. शिवाय भूमिपुत्रांच्या जमिनीत शासनाच्या वतीने हा पर्यटन प्रकल्प उभारल्यानंतर तो प्रकल्प भूमिपुत्रांच्या मालकीचा कसा राहील,याचाही विचार केला जाणार आहे. या योजनेतून जिल्ह्यातील भूमिपूत्र सक्षम होऊन जिल्ह्यासाठी ही योजना क्रांतिकारी ठरेल,असा विश्‍वास ना. केसरकर यांनी व्यक्‍त केला. 

तिलारीसाठी 100 कोटी निधी

चालूवर्षीच्या बजेटमधून तिलारीसाठी 100 कोटी रु. निधीची घोषणा करण्यात आली आहे. यातून तिलारीचे पाणी मालवण किनारपट्टी भागापर्यंत आणले जाणार आहे. यामुळे किनारपट्टीवरील क्षारयुक्‍त पाणी प्रश्‍न सुटून तेथील जनता व पर्यटकांना आरोग्यदृष्ट्या चांगले पाणी मिळणार आहे. याबाबत पाणीपुरवठा मंत्री ना. बबनराव लोणीकर यांच्यासमवेत बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्यात येणार आहे,अशी माहिती ना. केसरकर यांनी दिली.